लांजा:- वकील असल्याचे सांगत लांजातील प्रौढाला फसवल्याप्रकरणी रत्नागिरीमधील जीवन गणपत जाधव (५५, रा.नाखरे-रत्नागिरी) याच्यावर लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बाबाजी बुधाजी कोळापटे (६२, रा.आसगे, मांडवकरवाडी,) यांना जीवन याने वकील असल्याचे भासवत विश्वास संपादन केला. त्याने कोळापटे यांच्याकडून व्हॅगनार कार भाड्याने घेऊन ३७ हजार रुपये तसेच जेल कॅन्टीनचे काम देतो सांगत कोळापटेंचा ५ हजार रुपये किंमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल, त्यांच्या पत्नीचा २ हजार रुपये किंमतीचा मोबाईल त्याचप्रमाणे आपल्या नातीच्या शांतीच्या कार्यक्रमाचे कारण सांगून १ हजार ११० रुपये किंमतीचे ३७ नारळ अशी एकूण ४५ हजार ११० रुपयांची फसवणूक केली, ही घटना २३ जून ते १७ जुलै या कालावधीत घडली.
या प्रकरणी जीवन जाधव याच्या विरोधात लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देवकन्या मैंदाड करत आहेत.
दरम्यान, जीवन जाधव हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर या आधीही जेजुरी (पुणे), सावंतवाडी व ओरस (सिंधुदुर्ग) येथे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.