गुहागरः– गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विकास उर्फ अण्णा जाधव यांच्यावर नरवण येथे झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी गुहागर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या हल्ल्यातील फरार असलेला संशयित संदीप पवार याला मुंबईतील बदलापूर येथून गुन्हे अन्वेषण शाखेच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले आहे.
१७ नोव्हेंबर २०२४ रोजी नरवण येथील हॉटेल सावली येथे अण्णा जाधव त्यांच्या पत्नी आणि सहकाऱ्यांसोबत चहा घेत असताना अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला होता. हल्लेखोरांनी एका उमेदवाराचे नाव घेऊन, ‘यांच्या विरोधात बोलतोस का?’ असे म्हणत त्यांच्यावर वार केले. जाधव यांनी वार चुकवण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. तसेच, हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर दगड मारून नुकसान केले होते. या घटनेमुळे गुहागर तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती आणि निवडणुकीच्या वातावरणाला गालबोट लागले होते.
या घटनेनंतर गुहागर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला होता. काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी या गुन्ह्यातील दोन आरोपींना मुंबईतून अटक केली होती. मात्र, संदीप पवार हा तेव्हापासून फरार होता. गुहागर पोलीस त्याच्या मागावर होते आणि अखेर गुन्हे अन्वेषण शाखेच्या मदतीने त्याला बदलापूरमधून ताब्यात घेण्यात आले आहे.
संदीप पवारला आज, दि. १० मे २०२५ रोजी गुहागर न्यायालयात हजर केले जाणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुजित सोनावणे करत आहेत.









