जिल्ह्यात लाचखोरीच्या घटना घटल्या, दहा महिन्यात केवळ एक लाचखोर गजाआड
रत्नागिरी:- कोरोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडॉऊनच्या कालावधीत भ्रष्टाचार आणि लाचखोरीच्या घटना देखील घटल्याचे चित्र आहे. मागील दहा महिन्यात जिल्ह्यात अवघा एक लाचखोर अधिकारी गजाआड करण्यात अँटी करप्शन विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे. तर सर्वाधिक 30 जण ठाण्यात अटक झाले आहेत. यात रत्नागिरी जिल्हा सर्वात शेवटी आहे.
लाचलुचपत ( एसीबी ) च्या वतीने कोकण परिक्षेत्रात राबवण्यात आलेल्या कारवाईत १ जानेवारी ते २७ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत एकूण ६७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यातील ११२ लाचखोर आरोपींना गजाआड व्हावे लागले आहे. प्रतिबंधक विभागाच्या ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आदी सहा जिल्ह्यांचा कोकण परिक्षेत्रात समावेश होतो. या सहा विभागांतून सर्वाधिक ३० गुन्हे ठाणे जिल्ह्यात दाखल करण्यात आले आहेत. तर त्यापाठोपाठ पालघर विभागात १२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नवी मुंबईत ११ तर रायगडमध्ये ९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत .सिंधुदुर्ग जिल्ह्यात दहा महिन्यांत तीन तर रत्नागिरीत केवळ एक लाचखोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भ्रष्टाचाराला आळा बसावा म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अनेक विधाय पाऊले उचलण्यात येत आहेत. तसेच जनजागृती उपक्रम देखील राबविले जात आहेत. राज्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे जिल्ह्यातील राज्य सरकारचे विभाग, सहकारी संस्था व स्वायत्त संस्था तसेच सर्वसामान्य नागरिक यांचे प्रबोधन करण्यात येत आहे.