लॉकडाऊन इफेक्ट; जिल्ह्याच्या भात लागवड क्षेत्रात तीन हजार हेक्टरने वाढ 

रत्नागिरी:- जिल्ह्यात दरवर्षी 67 हजार 500 हेक्टरवर भात लागवड केली जाते; मात्र यंदा 70 हजार 572 हेक्टरवर लागवड झाली असून तुलनेत तीन हजार हेक्टरवर वाढ झाली आहे. कोरोना काळात अनेकजणं नोकर्‍या, रोजगाराला मुकल्यानंतर शेतीकडे वळले. परिणामी गावागावातील रिकामे राहीलेले शेतीक्षेत्र लागवडीखाली आले.

कोकणामध्ये पारंपरिक पध्दतीने भात लागवड केली जाते; परंतु गेल्या काही वर्षात भातशेती ही खर्चिक होऊ लागल्यामुळे गावागवातील जमिन पडीक राहू लागली होती. गावातील तरुण रोजगारासाठी मुंबईकडे वळतात. जिल्ह्यातून अन्य जिल्ह्यात स्थलांतरात रत्नागिरीचा क्रमांक लागतो. दरवर्षी जिल्ह्यात 67 हजार 500 हेक्टरवर भात लागवड केली जाते. यंदा त्यात 3 हजार 072 हेक्टरने क्षेत्र वाढलेले आहे. गतवर्षीपासून कोरोनामुळे टाळेबंदी झाली आणि मुंबईकर चाकरमानी गावाकडे परतले. गावात आल्यानंतर करायचे काय असा प्रश्‍न त्यांच्यापुढे होताच. त्यामुळे अनेकांनी पडीक जमिनीत शेती करण्यास सुरवात केली. शेतीसाठी घरात माणसे उपलब्ध राहिल्यामुळे कामे करणेही शक्य झाले. गतवर्षी कृषी, महसूल विभागाकडून झालेल्या पाहणी तेवढी वाढ दिसून आली नव्हती. यावर्षी कृषी विभागाने ऑनलाईन नोंदणीचा फंडा राबवला होता. कृषी पर्यवेक्षक प्रत्यक्ष जागेवर जाऊन भातशेतीची नोंदणी करत होते. परिणामी पडीक जमिनीवर झालेल्या लागवडीचीही नोंद झाली. प्रत्यक्षात यंदा किती भात लागवडीत वाढ झाली, ते समजू शकले. त्याचबरोबर निसर्गानेही बळीराजाला साथ दिली. यंदा तौक्ते वादळामुळे 16 मे रोजी पाऊस झाला. त्यानंतर जुनच्या पहिल्या आठवड्यात पावसाला सुरवात झाली. भाताच्या पेरण्या लवकर झाल्या आणि अजुनही कोरोनातील परिस्थिती जैसे थे च असल्याने काही चाकरमानी अजुनही गावातच आहेत. त्यामुळे लागवडीकडील कल यंदा अधिक असल्याचे कृषी, महूसल विभागाच्या नोंदींवरुन निश्‍चित झाले आहे. संगमेश्‍वर, खेड, राजापूर आणि दापोली या तालुक्यातील भात क्षेत्र वाढलेले आहे. या चारही तालुक्यात चाकरमान्यांची संख्या अधिक आहे.