‘लेट कमर्स’ सीईओंसह खातेप्रमुखांची जि. प. अध्यक्षांकडून कानउघडणी 

रत्नागिरी:- सभेच्या नियोजित वेळेत अध्यक्ष सभागृहात दाखल होतात मात्र मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांसह खातेप्रमुख नियोजित वेळेत का उपस्थित राहत नाहीत, असे खडे बोल सुनावत सभेला उशिराने येणार्‍या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांसह खातेप्रमुखांची नवनिर्वाचित अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी चांगलीच कानउघडणी केली. 

या सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी इंदूराणी जाखड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांच्यासह सर्व सदस्य व अधिकारी उपस्थित होते. मंगळवारी जिल्हा परिषदेतील सर्वसाधारण सभा शामराव पेजे सभागृहात पार पडली. या सभेमध्ये नूतन पदाधिकार्‍यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर अर्थसंकल्पीय सभेला सुरुवात झाली. नवनिर्वाचित शिक्षण व वित्त सभापती चंद्रकांत मणचेकर यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर ज्येष्ठ सदस्य उदय बने, रोहन बने यांनी अर्थसंकल्पात काही सूचना सुचविल्या. तर अर्थसंकल्पात काही फेरबदल करायचे असल्यास त्याचे सर्व अधिकार नवनिर्वाचित अध्यक्ष विक्रांत जाधव यांना सभागृहात देण्यात आले.