एसटी करणार राज्यभरात आंबा वाहतूक
रत्नागिरीः– एसटी महामंडळाच्या रत्नागिरी विभागातून राज्यात कोठेहि आंबा वहातूक केली जाणार आहे. थेट आंबा बागायतदार, व्यापाऱ्यांशी संपर्क करुन त्यांच्याकडील आंबा वाहतूक केला जाणार आहे. यासाठी स्वतंत्र कर्मचार्यांची नियुक्ती केली आहे. या नियोजनामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायतदारांना संपूर्ण राज्याची बाजारपेठ खुली होणार आहे.
येत्या आंबा हंगामात रत्नागिरी विभागातून आंबा वाहतूक करण्याचे नियोजन एसटी महामंडळ करत आहेत. आंबा बागायतदार आणि खरेदीदार या दोघांचाही फायदा विचार या योजनेत आहे. थेट बागेतून किंवा पॅॅकिंग हाउसमधून आंब्याच्या पेट्या उचलणे, एसटीने निश्चित केलेल्या ठिकाणी बागायतदारांनी पेट्या आणून देणे, एकाच व्यापार्याकडे सर्व माल उतरविणे, शहरातील विविध भागात ट्रक जाऊ शकेल, अशा ठिकाणी नगावर माल उतरविणे, असे पर्याय एसटीने खुले ठेवले आहेत. राज्यातील एखाद्या शहरातून एसटीकडे आंब्याची मागणी केली गेली तर त्या ग्राहकाला थेट बागायतदाराशी जोडून देण्याचे कामही एसटी करणार आहे. या नियोजनामुळे त्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायतदारांना संपूर्ण राज्याची बाजारपेठ खुली होणार आहे. राज्याच्या कानाकोपर्यातील जनतेला कोकणच्या बागेतील आंबा उपलब्ध होणार आहे.
५ डझनाच्या लाकडी खोक्यापासून २ डझनाच्या पुठ्याच्या खोक्यापर्यंत सर्व पॅकिंगमधील आंबा एसटी स्वीकारणार आहे. पुठ्ठ्याचा खोका फाटू नये, तळातील आंबापेटीवर दाब पडू नये, वाहतुकीदरम्यान ट्रकमधील आंबा खोके सरकू नयेत, हवा खेळती राहावी, यासाठी एसटी आपल्या ट्रकमध्ये आवश्यक ते तांत्रिक बदलही करणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील मोठ्या बागायतदारांसह छोट्या बागायतदारांनाही किफायतशीर दरात, राज्यात कुठेही आंबा पाठविण्याची व्यवस्था करण्यात येत असून गतवर्षीच्या हंगामातील अखेरच्या दिवसांत सुमारे ३५०० लाकडी खोक्यांची वाहतूक एसटी महामंडळाने केली. मुंबई उपनगरे, पुणे, वाशी मार्केटसह अकोला, औरंगाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आदी जिल्ह्यात एसटीने आंबा पोहोचविण्यात आला होता.