‘लाच’ प्रकरणी लेखा अधिकार्‍यावर जि.प.कडून निलंबनाची कारवाई

रत्नागिरी:- लेखा़ परीक्षण अहवालातील मुद्दे वगळण्यासाठी लाच स्वीकारताना 11 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या सिद्धार्थ शेट्ये या वित्त विभागातील सहाय्यक लेखा अधिकार्‍याला पकडण्यात आले होते. त्याच्यावर आता जि.प. प्रशासनाने मंगळवारी निलंबनाची कारवाई केली आहे.

दापोली पंचायत समितीच्या सहाय्यक लेखा अधिकार्‍यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार, त्यांच्या कार्यालयाचे सन 2020-21 आणि 2021-22 या आर्थिक वर्षांचे लेखापरिक्षण स्थानिक निधी लेखा परिक्षण कार्यालय, रत्नागिरी मार्फत करण्यात आले होते. या अहवालातील 21 प्रलंबित मुद्यांची पूर्तता करुन त्यांनी 5 ऑगस्ट 2025 रोजी अनुपाल अहवाल सादर केला होता. हा अहवाल अंतिम करुन घेण्यासाठी तक्रारदार यांनी 5 ऑगस्ट रोजी सहाय्यक संचालक शरद जाधव आणि कंत्राटी शिपाई सतेज घवाळी यांची भेट घेतली. त्यावेळी 21 मुद्दे वगळून अंतिम अहवाल देण्यासाठी जाधव यांच्यावतीने घवाळीने तक्रारदाराकडे 24 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
या लाच मागणीविरोधात तक्रारदाराने 11 सप्टेंबर 2025 रोजी रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.

यावेळी सहाय्यक संचालक शरद जाधव यांच्या संमतीने कंत्राटी शिपाई सतेज घवाळीने तक्रारदाराकडून 16 हजार 500 रुपयांची लाच स्विकारुन ती रक्कम तत्काळ जि.प.चे सहाय्यक लेखा अधिकारी सिध्दार्थ शेट्येकडे सुपूर्द केली. यावेळी दबा धरुन बसलेल्या एसीबीच्या पथकाने तिघांनाही रंगेहाथ पकडले होते. यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने सिद्धार्थ शेट्ये याच्यावर कारवाई करताना त्याचे मंगळवारी निलंबन करण्यात आले आहे.