रत्नागिरी:- लाईट बिल ऑनलाईन सिस्टिममध्ये अपडेट करण्याच्या बहाण्याने तोतया एमएसईबी अधिकार्याने वृध्दाच्या बँकेच्या लोन अकाउंट मधून परस्पर 5 लाख रुपये कर्ज मंजुर करुन ते मंजुदेवी नामक खात्यात वळते करत फसवणूक केली. ही घटना 25 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 ते सायंकाळी 4.30 वा.कालावधीत घडली आहे.
राहुल गुप्ता, मंजुदेवी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.त्यांच्याविरोधात अशोक शांताराम धकाते (55,मुळ रा.नागपूर सध्या रा.शिवाजीनगर,रत्नागिरी) यांनी रत्नागिरी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.त्यानुसार, 25 फेब्रुवारी रोजी दुपारी अशोक धकाते यांच्या पत्नीच्या मोबाईलवर राहुल गुप्ताने तुम्ही लाईट बिल न भरल्याने तुमचा विद्युत पुरवठा बंद करण्यात येणार असल्याबाबत मेसेज पाठवला होता.त्यामुळे अशोक धकाते यांनी त्या क्रमांकावर फोन केला असता बोलणार्याने आपले नाव राहुल गुप्ता सांगितले.त्यानंतर धकाते यांचे लाईट बिल ऑनलाईन सिस्टिममध्ये अपडेट करण्यासाठी प्ले स्टोअरवरुन एक अॅप डाउनलोड व इंस्टॉल करण्यास सांगितले.
धकाते यांनी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत त्याने सांगितल्याप्रमाणे अॅप इंस्टॉल केले.त्यानंतर राहुलने धकाते यांच्याकडून त्यांच्या डेबीट कार्डची माहिती घेउन त्याआधारे त्यांच्या लोन अकाउंटमध्ये 5 लाख रुपये मंजुर करुन घेतले.ती रक्कम परस्पर ऑनलाईन प्रणालीव्दारे त्यांच्याच खात्यात जमा करुन नंतर मंजुदेवी नामक खात्यात अनुक्रमे 4 लाख 50 हजार व 49 हजार रुपये असे वळते करत ऑनलाईन फसवणूक केली.