लांजा:- तालुक्यातील हसोळ येथील तरुणाच्या गळ्यावर सुरीने हल्ला केल्याची घटना मंगळवारी (ता.९) रात्री घडली आहे. हसोळ- बौद्धवाडी येथील मिलिंद अशोक कांबळे (वय ३७) यांनी याबाबत फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिलिंद कांबळे हे मंगळवारी रात्री वाडीतील प्रणव दीपक कांबळे, अभिषेक कांबळे, सुजय कांबळे, कुणाल कांबळे यांच्यासह हसोळ गावातील पऱ्यावर खेकडे पकडण्यासाठी गेले होते. यादरम्यान प्रणव कांबळे त्याला त्यांच्या वडिलांची तब्येत बिघडल्याचा फोन आल्याने मिलिंद कांबळे हे प्रणव याच्यासोबत त्याच्या घरी गेले. त्यावेळी
प्रणवचे वडील दीपक कांबळे आणि राजेंद्र रूपाजी कांबळे (वय ४०, रा. हसोळ बौद्धवाडी) या दोघांमध्ये वाद सुरू होता. त्यावेळी मिलिंद कांबळे यांनी राजेंद्र कांबळे यांना तुम्ही भावाला का ओरडता, असे विचारले. त्यावेळी त्याने मी त्याला सुरी दाखवली म्हणून त्याची तब्येत बिघडली आहे. आता तुला देखील सुरी दाखवू काय, असे सांगत घरात जाऊन सुरी आणली आणि मिलिंद कांबळे यांच्या गळ्यावर वार करून दुखापत केली. या घटनेनंतर मिलिंद कांबळे यांना रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी संशयित राजेंद्र रूपाजी कांबळे याच्यावर गुन्हा दाखल केला.