लांजा येथे १० जणांकडून रिक्षा व्यावसायिकाला बेदम मारहाण

लांजा:- आपल्या सहकाऱ्याच्या विरोधात लांजा पोलीस ठाण्यात तक्रार केली याचा राग मनात ठेवून १० रिक्षा व्यावसायिकांनी एका रिक्षा व्यावसायिकाला बेदम मारहाण केल्याची घटना लांजा तालुक्यातील विलवडे रेल्वेस्टेशन येथील वरच्या गेटवरती घडली. या प्रकरणी मारहाण करणाऱ्या १० रिक्षा व्यावसायिकांच्या विरोधात लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची फिर्याद सुरेंद्र सुभाष खामकर (वय ४२, रा.विलवडे कोंड, खामकरवाडी, ता.लांजा) यांनी लांजा पोलीस ठाण्यात केली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, विलवडे रेल्वे स्टेशन या ठिकाणी विलवडे रिक्षा संघटना असून अनेक रिक्षा व्यावसायिक या ठिकाणी व्यवसाय करतात. मुळचे विलवडे येथीलच रहिवाशी असलेले सुरेंद्र खामकर हे देखील या ठिकाणी रिक्षा व्यवसाय करतात. मात्र ते रिक्षा संघटनेचे सदस्य नाहीत, त्यामुळे अन्य रिक्षा संघटनेचे सदस्य व त्यांच्यामध्ये वाद सुरू होता. याच अनुषंगाने ४ मे रोजी रिक्षा व्यावसायिक विनायक रामदास खामकर (वय ४०, राहणार आरगाव) याच्या विरोधात सुरेंद्र खामकर यांनी लांजा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. याचा राग मनात धरून सुरेंद्र खामकर हे आपल्या मालकीची रिक्षा क्रमांक (एमएच.०८.एक्यू ८९११) घेऊन विलवडे रेल्वे स्टेशन येथील वरच्या गेट वरती थांबले असताना विलवडे रिक्षा संघटनेचे सदस्य असलेले रिक्षा व्यावसायिक त्यामध्ये विनायक रामदास खामकर (राहणार आरगाव, ता.लांजा) तसेच प्रदीप शांताराम खामकर (वय ४२) मनोहर जनार्दन खामकर (वय ३०), सूर्यकांत तुकाराम कानसे (वय ३५, हे तिन्ही राहणार विलवडे, ता.लांजा) तसेच विजय जाधव (वय ४५, राहणार वाडगाव, ता.लांजा), विनोद गोपीनाथ मांडवकर (वय ३५), प्रतीक प्रकाश मांडवकर (वय २७, हे दोन्ही राहणार वाघणगाव, ता.लांजा) तसेच दिपक तुकाराम तोरस्कर (वय ४५, राहणार रिंगणे, ता.लांजा), तसेच उमेश वामन खामकर (वय ४०, राहणार आरगाव) आणि सुनील अनंत शिगम (वय ४०, राहणार व्हेळ) अशा दहा रिक्षा व्यवसायिकांनी सुरेंद्र सुभाष खामकर यांना शिवीगाळ करून तसेच जमिनीवर पाडून हाताने थापटाने तसेच लाथा बुक्क्याने बेदम मारहाण केली. त्याचप्रमाणे यापुढे तू इथे रिक्षा लावलीस तर तुला याच पद्धतीने मारणार अशी धमकी दिली. तसेच सुरेंद्र खामकर यांचा मोबाईल देखील आपटून फोडून टाकण्यात आला.

या प्रकरणी सुरेंद्र खामकर यांनी लांजा पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीनुसार वरील दहाही रिक्षा व्यवसायिकांच्या विरोधात लांजा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १८९(२), १९१(२), १९०, ११५(२), ३५२, ३५१(२), ३२४ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन भुजबळराव हे अधिक तपास करत आहेत.