लांजा येथे गावठी हातभट्टी दारू प्रकरणी एकावर गुन्हा

लांजा:- तालुक्यातील कोर्ले बौद्धवाडी परिसरात अवैध दारूविक्री विरोधात लांजा पोलिसांनी धडक कारवाई केली असून, केळीच्या बागेत लपवून ठेवलेली गावठी हातभट्टीची दारू जप्त केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका ४६ वर्षीय व्यक्तीवर दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ९ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास कोर्ले सहकारवाडी येथील विशाल कांचळे यांच्या घरामागील बाजूला असलेल्या केळीच्या झाडांच्या आडोशाने गावठी दारूची विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल नितेश नवनाथ राणे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी छापा टाकला. या कारवाईत संशयित आरोपी दिनेश गणपत जाधव (वय ४६, रा. कोर्ले बौद्धवाडी, ता. लांजा) हा विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू विक्रीसाठी बाळगून असताना मिळून आला.

पोलिसांनी केलेल्या या कारवाईत ५३५ रुपये किमतीचा ५ लिटर गावठी हातभट्टीची दारू असलेला लाल रंगाचा प्लास्टिकचा कॅन आणि दारूचा वास असलेले ग्लास जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) नुसार आणि गु.आर.क्र. ०७/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.