लांजा बाजारपेठ चव्हाटा मंदिर येथील दोन घरे चोरट्याने फोडली

लांजा:- लांजा शहरातील  बाजारपेठेतील चव्हाटा मंदिर या ठिकाणी बंद असलेली दोन घरे चोरट्यांकडून फोडण्यात आल्याची घटना शनिवारी २५ डिसेंबर रोजी उघडकीस आली आहे .मात्र दोन्ही घरांचे घरमालक हे बाहेर असल्याने घरात किती रुपयांची चोरी झाली किंवा ऐवज चोरीला गेला याबाबत अधिकृत माहिती शनिवारी रात्री उशिरापर्यंत समजू शकलेली नाही.             

शनिवारी सकाळच्या दरम्यान ही चोरी झाल्याचा असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. लांजा बाजारपेठेतील चव्हाटा मंदिर येथील विजय तुकाराम खुळे आणि रेखा विनायक शिर्के यांची एकमेकांना लागून असलेले दोन बंद घरे ही चोरट्यांनी फोडली आहेत. विजय खुळे हे मुंबईला गेले होते तर रेखा शिर्के यांचे कुटुंबीय हे रत्नागिरी येथे आठ दिवसांपूर्वी गेले होते. त्यामुळे ही दोन्ही घरे बंद होती. याचा फायदा उठवत चोरट्यांनी ही दोन्ही  बंद घरे फोडली आहेत. शनिवारी 25 डिसेंबर रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे चोरट्यांनी कपाट फोडुन सामान अस्ताव्यस्त केल्याचे पोलिस तपासात दिसून आले आहे.         

मात्र या घटनेतील दोन्ही मालक तालुक्याच्या बाहेर असल्याने त्यांची अधिकृत तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झालेली नाही. ते लांजा येथे आल्यानंतरच त्यांच्या घरात किती रुपयांची चोरी झाली आहे किंवा दागिन्यांची चोरी झाली आहे याबाबतचे अधिकृत माहिती कळणार आहे .मात्र या घटनेनंतर लांजा पोलिसांकडून ठसे तज्ज्ञ तसेच श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते . या घटनेने लांजा शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.