लांजा नगरपंचायतीमधून कुवे गावाला वगळा

संघर्ष समितीच्या वतीने ना. नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

लांजा:- घनकचरा प्रकल्प व विकास आराखड्यावरून लांजा नगरपंचायतीभोवती सध्या वादाचा फेरा सुरू झाला असतानाच आता कुवे गावच्या रूपाने नवा संघर्ष निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. लांजा नगरपंचायत कार्यक्षेत्रातून कुवे गावाला वगळण्यात यावे, अशी मागणी आता कुवे ग्रामपंचायत संघर्ष समितीच्या वतीने मत्स्य व्यवसाय व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. त्यामुळे लांजा नगरपंचायतीसमोर नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

लांजा नगरपंचायत कार्यक्षेत्रात समाविष्ट असणार्‍या कुवे गावातील नागरिकांनी यापूर्वी कृती आराखडा व डंपिंग वरून प्रशासनाला चांगलेच धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले होते. आता मात्र नव्या वादाला तोंड फुटले आहे. नगरपंचायतीकडे बोट दाखवत कुवे गावसाठी नगरपंचायतच नको, असे स्पष्ट संकेत कुवे गावच्या ग्रामस्थांनी दिले आहे. मंत्री नितेश राणे यांना दिलेल्या एका निवेदनात कुवे ग्रामपंचायत संघर्ष समितीने म्हटले आहे की, 6 ऑक्टोबर 2012 रोजी महाराष्ट्र शासनाने लांजा नगरपंचायतीची रचना केली. लांजा शहर अर्थात लांजा तालुका ठिकाणाबरोबर कुवे व गवाणे या दोन ग्रामपंचायतींचा समावेश लांजा नगरपंचायतीमध्ये करण्यात आला. त्यानंतरच्या काळात गवाणे या ग्रामपंचायत क्षेत्राला लांजा नगरपंचायतीमधून वगळण्यात आले. मात्र, यावेळी कुवे ग्रामपंचायत क्षेत्राचा विचार करण्यात आला नाही.

कुवे गाव लांजा नगरपंचायतीपासून सुमारे 5 कि.मी. अंतरावर असून कुवे गाव ग्रामीण भागामध्ये येते. गावातील ग्रामस्थ सर्वसामान्य शेतकरी असून त्यांचा मुख्य व्यवसाय शेती व मोलमजुरी आहे. येथील शेतकर्‍यांची आर्थिक परिस्थिती बेताची असून गावातील बहुसंख्य ग्रामस्थ सर्वसामान्यांचे जीवन जगत आहेत. लांजा नगरपंचायतीमध्ये कुवे गाव समाविष्ट झाल्यापासून गावाचा विकास योग्यरीत्या झाला नाही. शेतकर्‍यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार केल्यास नगरपंचायतीतून बसणारा विविध प्रकारचा कर शेतकर्‍यांना परवडणारा नाही. तसेच लांजा ते कुवे या पाच किमी अंतराचा विचार केल्यास क्षुल्लक कामांसाठी लांजा येथे जाणे- येणे आर्थिक व वेळेची गैरसोय होत आहे. यासह कुवे ग्रामपंचायतीमध्ये 50 एकर वनक्षेत्र असून 70 एकर जागा लघु पाटबंधारेच्या तलावामध्ये गेली आहे. त्यामुळे गावाचे क्षेत्र आधीच कमी झाले आहे. कुवे गावाची 2011 च्या जन गणनेनुसार 2 हजार 63 लोकसंख्या आहे. त्यामुळे शासन निर्णयानुसार तालुका ठिकाणच्या गावाची नगरपंचायत जाहीर करण्यात आली. मात्र, 2011 ची लोकसंख्या पाहता लांजा शहराची लोकसंख्या वाढली आहे. सध्या लांजा शहर लोकसंख्येने परिपूर्ण शहर झाले आहे. नगरपंचायत निर्माती करताना लांजा शहराला लोकसंख्येचा निकष पूर्ण करण्यासाठी तत्कालीन कुवे गावाचा आधार घ्यावा लागला होता. मात्र, सद्या लांजा शहराची लोकसंख्या निकष पूर्ण झाली असल्याने कुवे गावाला लांजा नगरपंचायत हद्दीतून वगळण्यात यावे, अशी मागणी कुवे ग्रामपंचायत संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

यावेळी मत्य व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांना निवेदन देताना अशोक गुरव, दीनानाथ सुर्वे, कृष्णा निवळे, केशव गुरव, कमलाकर गोरे, चंद्रकांत नेमण, मदन रडये, सिद्धेश नेमण, चंद्रकांत वाडकर, मोहन नेमण, गणपत सावंत, सचिन खानविलकर, महेश सुर्वे, संतोष दुडये, सचिन वारेशी उपस्थित होते.