लांजा येथे जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल

लांजा:- जातिवाचक शिवीगाळ करून काठीने व बांबूने मारहाण करून दुखापत करत 1 लाख 50 हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 23 जानेवारी 2024 रोजी रात्री हर्चे फाटा येथे घडली होती. या घटनेप्रकरणी बुधवार 28 फेब्रुवारी रोजी रात्री 8.42 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबतची फिर्याद संदीप राजाराम जाधव (वय 35, राहणार साटवली) यांनी लांजा पोलीस ठाण्यात केली आहे. संदीप जाधव हे अजय नारायण तरळ (वय 43, राहणार साटवली गांगोवाडी) यांच्या मालकीच्या बोलेरो पिकआप गाडीमधून चार गाई विठ्ठल धोंडू शिर्सेकर (वय 66, राहणार हर्चे तांबेवाडी) यांचेकडून विकत घेऊन आपल्या घरी साटवली येथे घेऊन जात होते. यावेळी अभिषेक तेंडुलकर, भैरू भंडारी व इतर अशा एकूण चार इसमांनी हर्चे फाटा येथे रस्त्यावर दगड लावून त्यांची गाडी अडवून ठेवली. त्यानंतर त्यांना तुझी जात कोणती? असे विचारले. यावरून जातीवाचक बोलून फिर्यादी व साक्षीदार यांना काठीने व बांबूने मारहाण करून दुखापत केली. तसेच शिवीगाळ करून त्यांच्याकडे 1 लाख 50 हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर पैसे दिले नाही म्हणून पुन्हा शिवीगाळ करून मारहाण केली. यामध्ये संदीप जाधव, अजय तरळ आणि विठ्ठल शिर्सेकर हे तिघेजण जखमी झाले.

याप्रकरणी संदीप जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लांजा पोलिसांनी अभिषेक तेंडुलकर, भैरू भंडारी व अन्य दोघे अशा चौघावर लांजा पोलीस ठाण्यात भा.दं.वि.कलम 143, 147, 148, 149, 341, 324, 385 सह अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध) दुरुस्ती अधिनियम 2015 चे कलम तीन (1), (आर) (एस), 3(2), (व्ही.ए) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे हे करत आहेत.