लग्न समारंभातून अडीच लाखांचे दागिने लंपास

खेड कशेडी ओझरवाडी येथील घटना

खेड:- तालुक्यातील कशेडी ओझरवाडी येथे एका विवाह समारंभासाठी आलेल्या महिलेचे सुमारे २ लाख ५८ हजार ७३६ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​फिर्यादी सौ. वैशाली विनायक सुर्वे (वय ५२, रा. अंधेरी, मुंबई; मूळ रा. म्हसळा, रायगड) या आपल्या भाचीच्या लग्नानिमित्त कशेडी ओझरवाडी येथील विजय नारायण दरेकर यांच्या घरी आल्या होत्या. दि. ३ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:३० ते ४ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:३० या दरम्यान, लग्नाच्या घाईगडबडीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या बॅगेतील किंवा अंगावरील दागिने चोरून नेले.

​चोरट्याने लंपास केलेल्या दागिन्यांमध्ये ​सोन्याचे मंगळसूत्र, ​सोन्याचा नेकलेस, ​सोन्याचे ब्रेसलेट आदि वस्तूंचा समावेश आहे ज्याची एकूण किंमत २,५८,७३६ रुपये आहे.

​दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर सौ. सुर्वे यांनी खेड पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी या प्रकरणाची नोंद केली आहे. भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३०५ (क) नुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ३५/२०२६ अन्वये दाखल करण्यात आला आहे.