लग्नाचे आश्वासन देऊन 50 हजाराची फसवणूक

रत्नागिरी:- भारत मॅट्रिमोनी या वेब साईटवर ओळख झाल्यानंतर लग्नाचे आश्वासन देऊन 51 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. या प्रकरणी अज्ञात दोन महिला व एक पुरुष यांच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 31 जानेवारी ते 6 फेब्रुवारी 2023 या कालावधीत कुवारबाव येथे घडली आहे.

फिर्यादी विराज अरविंद दळवी यांची जानेवारी महिन्यात भारत मॅट्रिमोनी या वेब साईटवर एका महिलेशी ओळख झाली होती. तिने विराजला लग्न करण्याचे आश्वासन देऊन तसेच काही न काही कारणे सांगून त्यांच्याकडून 50 हजार 666 रुपये आपल्या एका अन्य सहकारी महिलेच्या फोन पे व्दारे स्विकारले. तसेच एका पुरुष सहकार्‍याच्या मदतीने आपले वडील असल्याचे भासवून विराजशी बोलणे करुन दिले होते. दरम्यान या प्रकरणात फसवणूक होत असल्याचे विराजच्या लक्षात येताच त्याने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. हा गुन्हा खेड पोलिस ठाण्यातून ऑनलाईन शहर पोलिस ठाण्यात मंगळवारी वर्ग करण्यात आला आहे. याप्रकरणी तीनही संशयितांविरुद्ध भादंवि कलम 420, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.