लग्नाचे अमिष दाखवत २ लाखांची फसवणूक

डोंगर-मुसलमानवाडी येथील घटना

पाचल:- घटस्फोटित व्यक्तीला लग्न जुळवून देण्याचे आमिष दाखवून १ लाख ८३ हजार रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी राजापूर तालुक्यातील डोंगर येथील मुबीन फकीर कालू याच्याविरोधात राजापूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याची माहिती राजापूर पोलिसांनी दिली. या प्रकरणी सज्जाद अब्दुलरेहमान मस्तान (५०) यांनी राजापूर पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

सज्जाद घटस्फोटित असून त्यांच्याच गावातील मुबीन फकीर कालू याने एका मुलीशी लग्न लावून देतो असे सांगून लग्नाच्या बोलणीसाठी १६ हजार रुपये व मुलीचे वडील आजारी असल्याचे सांगून ३४ हजार रुपये घेतले. त्यानंतर मुलीचा नंबर असल्याचे भासवून मुबीन याने व्हॉटसअपद्वारे संबंधित मुलीशी चॅटिंग करून कपडे खरेदीसाठी वारंवार पैशाची मागणी करून नोव्हेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ या कालावधीत तब्बल १ लाख ३३ हजार रुपये उकळले. त्यानंतर मागील ३ वर्षांपासून मुबीन कालू पैसे देण्यास टाळाटाळ करीत असल्याने अखेर सज्जाद यांनी राजापूर पोलिसांत मुबीन कालू याच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी मुबीन कालू याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास राजापूर पोलिस करत आहेत.