रत्नागिरी:- रेल्वेच्या ठेकेदाराचा विश्वासघात करुन जनरेटरच्या एका महिन्याचे 15 हजार व 40 महिन्यांचे भाड्याचे 6 लाख व जनरेटरची किंमत 2 लाख अशी 8 लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी दोन संशयित ठेकेदारांविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी येथील न्यायालयात त्या दोन्ही संशयितांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जय माणिकराव कदम (वय 60,) व कुणाल जय कदम (वय 30, दोन्ही रा.12/1, विजयनगर कॉलनी, कदमवाडी रोड, कोल्हापूर) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना 11 डिसेंबर 2021 सायंकाळी सहाच्या सुमारास टिके-रत्नागिरी येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी श्रीनिवासराव गोपालकृष्णय्या गोगीनेनी (वय 57, रा. मिरजोळे पाडावेवाडी-कुवारबाव, रत्नागिरी) हे रेल्वे ठेकेदार आहेत. ते एल ॲण्ड टी कंपनीकडून रेल्वेची कामे घेतात. यातील संशयित जय कदम हा सिव्हिल ठेकेदार असल्याने तो त्यांच्या परिचयाचा होता.
11 डिसेंबरला टिके येथे एल ॲण्ड टी कंपनीच्या मालकिचा व फिर्यादी यांच्या ताब्यात असलेला जनरेटर जय कदम व कुणाल कदम यांना काही दिवसांकरता भाडेतत्वावर वापरायला दिला होता. तो स्वतसाठी वापरून फिर्यादी यांना परत न करता त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी रेल्वे ठेकेदार गोगीनेनी यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्या तक्रारीवरुन पोलिसांनी दाखल गुन्हय़ामुळे दोघा संशयितांनी येथील न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. त्यावर सुनावणी झाली असता दोन्ही संशयितांयावतीने ॲङ सचिन पारकर यांनी काम पाहिले.









