रेल्वेत चोरीच्या घटनांमध्ये वाढ; सुरक्षा वाढवण्याची मागणी

रत्नागिरी:- सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी प्रत्येक जण रेल्वे प्रवासाला प्राधान्य देतो. मात्र, वाढत्या गर्दीचा फायदा घेत चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. वाढत्या चोऱ्यांमुळे प्रवाशांची सुरक्षा व्यवस्थाच धोक्यात आली असून, याकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.

सौ.उज्वला सुनील गावडे (49) या प्रवाशी गुरुवारी 7 जुलै रोजी मैगलोर एक्स्प्रेसने (मैगलोर सीएसटी 12134) मुंबईकडे जाण्यासाठी कणकवली रेल्वेस्थानकावर आल्या. बोगी नंबर एस 4 मधील 32 नंबरवरील अप्पर बर्थ सिट होती. मैगलोर एक्सप्रेस 1.45 च्या दरम्यान कणकवलीहून सुटली. आणि 4.30 वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी स्थानकावर पोहोचली.

उज्वला गावडे अप्पर बर्थवर झोपल्या होत्या. काही लाईटस बंद होत्या. रत्नागिरी स्थानकावरून ट्रेन सुटताच काही क्षणातच चोरट्याने त्यांच्या झोपेचा फायदा घेऊन त्यांच्या डोक्याखाली ठेवलेली लेडीज पर्स लांबवली. पर्समध्ये आतील बाजूस साडेचार तोळ्याचे मंगळसूत्र, 18 हजार रुपये रोख, सॅमसंग कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल, पॅन कार्ड, आधार कार्ड, इलेक्शन कार्ड, असा एकूण 3 लाख 17 हजारांचा ऐवज चोरांनी पळविला. त्यांच्या सीटच्या आजूबाजूला एक महिला व तीन पुरुष हिंदी भाषिक असल्याचे उज्वला गावडे यांनी ठाणे पोलिसांना सांगितले.

उज्वला गावडे यांच्या तक्रारीवरून ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात अंमलदार पंढरी कांदे यांनी भांदवि कलम 379 अन्वये चोरीचा गुन्हा FIR दाखल केला आहे.