रेल्वेत चढत असताना महिलेच्या पर्समधील सव्वा लाख किमतीच्या दागिन्यांची चोरी

रत्नागिरी:- कोकण रेल्वेच्या सावंतवाडी-दिवा रेल्वेगाडीत चढत असताना गर्दीचा फायदा उठवत महिलेच्या पर्समधील १ लाख ३० हजार रुपये किंमतीचे दागिने चोरट्याने लंपास केले.

खेड तालुक्यातील कळंबणी बुद्रुक गावच्या रहिवासी माधुरी उमेश शिंदे (सध्या राहणार दिवा) यांनी ही फिर्याद दिली. त्या १४ मे रोजी खेड स्थानकात सावंतवाडी दिवा गाडीत चढत असताना गर्दी झाली होती. या गर्दीमधून गाडीत शिरल्यानंतर त्यांच्या पर्समधील मंगळसूत्र, सोनसाखळी, रिंगा, नथ असे एक लाख ३० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्याने लांबवल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना होणाऱ्या गर्दीचा फायदा उठवत महिलांच्या पर्समधून दागिने लंपास करण्याचे सत्र सुरूच आहे.