राजापूर:- रूमच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारातून मारहाण झाल्याची घटना मुसलमानवाडी येथे घडली. या प्रकरणी दोन्ही गटाकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून राजापूर पोलिसांनी सातजणांविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती राजापूर पोलिसांनी दिली.
या प्रकरणी अन्वर फकीर शेमले यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हंटले आहे, 31 जुलै रोजी रात्री 8.15 च्या दरम्यान डोंगर स्टॉप येथील बिल्डींगमधील सुमारे दीड वर्षांपूर्वी विकत घेतलेल्या फ्लॅटचे अद्यापपर्यंत रजिस्ट्रेशन झाले नसल्याने एजंट सज्जाद मस्तान यांना विचारणा केली. याबाबत सज्जाद मस्तान यांनी तुम्ही रूम 12 लाख नाही तर 12 लाख 50 हजारला घेतली आहे. मी तेवढेच पैसे घेणार, नाहीतर तुम्ही रुम खाली करुन निघून जा, असे बोलून शेमले यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावर शेमले शिवीगाळी करु नको असे सांगत असताना त्यांनी न ऐकता मारहाण करण्यास सुरूवात केली. ते वरती पायरीवर उभे असल्याने पायरीवर पडलेल्या पावसाच्या पाण्यावरून त्यांचा पाय घसरुन खाली पडले. त्यामध्ये त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. मी त्यांना उठवत असताना त्यांनी तेथे असलेली बांबुची काठी घेवून मला मारहाण केली. त्यांनंतर त्यांच्या पत्नीने देखील मला ढकलून दिल्याचे शेमले यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. त्यानुसार राजापूर पोलिसांनी सज्जाद अब्दुल रेहमान मस्तान व शाहीन मस्तान यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.