रत्नागिरी:- नाणार (ता. राजापूर) येथे आता ग्रीन रिफायनरी नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बारसू (ता. राजापूर) येथे रिफायनरीसाठी जागा उपलब्ध होऊ शकते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राने कळवले आहे. प्रकल्पासाठी जर ती जागा योग्य असल्याचे केंद्राने कळवले की, स्थानिकांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करूनच प्रकल्प हवा की नको याबात पुढील निर्णय घेतला जाईल आणि हीच शासनाची आणि शिवसेनेची भूमिका आहे, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
झूम मीटिंगद्वारे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यादरम्यान पुन्हा एकदा रिफायनरी प्रकल्पाचा विषय चर्चेला आला. त्यामुळे प्रकल्पाबाबत शिवसेनेची आणि शासनाची नेमकी भूमिका काय, असे सामंत यांना विचारले असता ते म्हणाले, ग्रीन रिफायनरीसाठी नाणारचा विषय संपला आहे. उद्धव ठाकरे यांनी तशी घोषणा केली आहे; मात्र बारसू येथे आवश्यक जागा उपलब्ध होऊ शकते आणि तशा आशयाचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. हा प्रकल्प हवा की नको, याबाबत स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल. स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात न घेताच नाणार येथे रिफायनरी प्रकल्प लादला गेला. त्या वेळी शिवसेना स्थानिकांसोबत राहिली. बारसू येथे प्रकल्पासाठी आवश्यक सुमारे १० ते १२ हजार एकर जागा उपलब्ध होऊ शकते. एमआयडीसीच्या ताब्यातील ती जागा आहे. प्रकल्पासाठी ती योग्य आहे की नाही, हे तपासून केंद्र शासन कळवेल. सर्व जागा कातळ आहे. तेथे घरे किंवा मोठ्या प्रमाणात बागा नाहीत. त्यामुळे विस्थापित होण्याचा प्रश्न नाही.
सात-बारा तपासा, दुध का दुध और…
ज्या भागात ही ग्रीन रिफायनरी होणार आहे तेथील जमिनी मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्या आहेत. त्यामध्ये अनेक उद्योजकांसह, लोकप्रतिनधींची नावे असल्याचे बोलले जाते. यावर उत्तर देताना सामंत म्हणाले, तेथील सात-बारा तपासून बघा म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल.









