रत्नागिरी:- रिक्षा व्यवसाय व्यवसाय करता करता अनेकवेळा रिक्षातील प्रवाशांचा आपल्या गोड वाणीने विश्वास संपादन करण्याचे तंत्र शहर पोलीस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेल्या संशयित सुभाष सुर्वे याने आत्मसात केले होते. सुर्वे याने घरातील अडचणी किंवा दोष दूर करतो असे सांगून दागिने घेऊन परत केले नसतील तर अशा नागरिकांनी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक भगवान पाटील यांनी रत्नागिरीतील जनतेला केले आहे.
पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या संशयित सुभाष सुर्वे याच्या बोलण्यावर विश्वास बसलेल्या प्रसाद मराठे व साक्षीदार प्राची महेश आखरेकर यांची अशाचप्रकारे फसवणूक झालेली आहे. सुभाष सुर्वे याने तुमच्या घरात अनेक अडचणी आहेत. याची मला माहिती आहे. माझ्या ओळखीचे बाबा आहेत. ते ही संकटे दूर करतील. त्यासाठी देवापुढे आकार ठेवण्यासाठी तुमचे दागिने हवे आहेत असे सांगून त्याने ७ लाख ५० हजार रुपये किमतीचे दागिने घेत फसवणूक केलेली आहे.
सुर्वे याने विश्वास संपादन करून सुमारे ७ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेतले होते. ते परत न करणाऱ्या सुभाष बाबासाहेब सुर्वे (४९ रा. विश्वशांती संकुल, अभुदयनगर, दैवज्ञ भवन जवळ नाचणे) याला शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. संशयित सुभाष सुर्वे हा रिक्षा चालक असून नियमित भाडेकरूंचा विश्वास बसल्यानंतर तो फसवणुकीची संधी साधत असल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे.
अशाप्रकारे फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या रिक्षाव्यावसायिक सुभाष सुर्वे याने घरातील अडचणी किंवा दोष दूर करतो असे सांगून दागिने घेऊन परत केले नसतील. तर अशा नागरिकांनी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक भगवान पाटील यांनी रत्नागिरीतील जनतेला केले आहे.