रिक्षा चालकाच्या शर्टमधून एक किलोपेक्षा अधिक गांजा जप्त

रत्नागिरी:- अंमली पदार्थाच्या तस्करीसाठी काढलेली नामी शक्कल शहर पोलिसांनी हाणून पाडली आहे. चक्क गांजाच्या तस्करीसाठी रिक्षेचा वापर करून गांजा तस्करी करणार्‍या तरूणाला शहर पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडले. मागील दोन महिन्यातील ही दुसरी घटना असून डीबी स्क्वॉडच्या कर्मचार्‍यांनी गांजा तस्करांचे कंबरडे मोडून काढले आहे.

रत्नागिरी शहरात गांजा विक्री होत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून शहर पोलीस संशयितांच्या मागावर होते. यापूर्वीदेखील अशाच प्रकारची एक कारवाई एमआयडीसी परिसरात झाली होती. मात्र पोलिसांची चाहूल लागल्याने मोठा मुद्देमाल गायब करण्यात संशयितांना यश आले.

शहरात गांजाची विक्री सुरू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरुन डीबी स्क्वॉडचे पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक जाधव, पो. ना. राहूल घोरपडे, पो. ना. प्रविण बर्गे आदी कर्मचारी संशयितांच्या मागावर होते. गेले काही दिवस हे कर्मचारी शहरात प्रत्येक नाक्यात साध्या पेहरावात लक्ष ठेवून होते.

शहर पोलीस स्थानकातील पोलीस नाईक राहुल घोरपडे यांना गांजाबाबत खबर मिळाली होती. ही माहिती मिळताच त्यांनी आपल्या वरिष्ठांना त्याबाबतची कल्पना दिली. तसेच त्यांचे सहकारी दीपक जाधव व प्रविण बर्गे हेदेखील कारवाईसाठी रवाना झाले.

मोठ्या प्रमाणात गांजा तस्करी होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर डिवायएसपी वाघमारे, पोलीस निरीक्षक अनिल लाड यांच्यासह शहर पोलीस स्थानकातील अन्य कर्मचारी कारवाईसाठी रवाना झाले. एकामागोमाग एक गाड्यांचा ताफा शहरातून धावू लागला.

दुपारच्या सुमारास अचानक पोलीस गाड्या रस्त्यावर धावू लागल्या. काही कर्मचारी दुचाकीवरून विमानतळाच्या दिशेने जात होते. यामुळे एखाद्या मंत्र्याचे हेलिकॉप्टर लॅण्ड होतेय की काय? अशी शंका अनेकांना आली होती. मात्र पाठोपाठ फॉरेन्सिक लॅबची गाडीदेखील गेल्याने पाहणार्‍यांची चलबिचल वाढली होती.

मिरजोळे आणि एमआयडीसी परिसर नेमकी कोणत्या दिशेने वाहन येणार याबाबत साशंकता होती. यासाठी पोलीस निरीक्षक अनिल लाड यांनी कर्मचार्‍यांच्या दोन टीम केल्या व त्या परिसरात सापळा लावला होता.

पोलीस नाईक राहूल घोरपडे यांना जी माहिती मिळाली होती त्या पद्धतीने पोलिसांनी विमानतळ परिसरात सापळा रचला होता. विमानतळ येथून कोस्टगार्ड कार्यालयाच्या नव्या इमारतीकडे जाणार्‍या रस्त्यावर पोलिसांनी सापळा रचला होता. त्याचदरम्यान भरधाव रिक्षा त्या मार्गावरून आली आणि पोलिसांनी फिल्मी स्टाईल रिक्षा अडवली.

या रिक्षा चालकाकडे पोलिसांनी चौकशी केली असता सुरूवातीला त्याने उडवाउडवी केली. मात्र पोलिसी खाक्या मिळताच रिक्षा चालक पोपटासारखा बोलू लागला. शिवलिंगाप्पा मल्लेशी पुजारी (वय २६, रा. क्रांतीनगर झोपडपट्टी) असे नाव त्याने पोलिसांना सांगितले.

या रिक्षा चालकाने कोणाला संशय येऊ नये यासाठी अंगात परिधान केलेल्या शर्टमध्ये गांजा लपवला होता. अंगझडतीवेळी पोलिसांनी त्याच्या शर्टमधून १ किलो ४० ग्रॅम गांजा पंचांसमक्ष जप्त केला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर रिक्षा चालकाची बोबडी वळली.

या कारवाईत पोलिसांनी गांजासह एक रिक्षा व अन्य ऐवज असा मिळून सुमारे ६४ हजार रूपयांचा ऐवज जप्त केला आहे. रिक्षा चालक शिवलिंगाप्पा पुजारी याच्याविरोधात अंमली पदार्थ कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, डिवायएसपी वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल लाड, पोहेकॉ कोकरे, पोहेकॉ जाधव, पोहेकॉ चांदणे, पो. ना. सावंत, पो. ना. राहूल घोरपडे, पो. ना. प्रविण बर्गे, एएसआय हरचकर, साळवी आदी कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते.