रिक्षा चालकांना लुटणारी टोळी अद्यापही पोलिसांच्या हाताबाहेरच 

रत्नागिरी:- 15 दिवसांपूर्वी रत्नागिरीतील 2 रिक्षा चालकांना गुंगीचे औषध देवून लुटणार्‍या टोळीच्या अद्याप थांगपत्ता लागलेला नाही. 15 दिवस उलटूनही शहर पोलिसांनी संशयिताना ताब्यात घेतलेले नाही. सीसीटीव्हीमध्ये संशयित कैद झाले होते़ असे असतानाही अद्याप टोळीला गजाआड करण्यात पोलिसांना अपयश आले आहे. दरम्यान पोलिसांची पथके जिल्ह्याबाहेर या टोळीचा शोध घेत असल्याचे सांगण्यात आले.

ही घटना 11 जून रोजी घडली होती. गणपतीपुळे येथे जायचे असल्याचे शहरातील दोघा रिक्षा चालकांना या टोळीकडून सांगण्यात आले होते़  आशिष संजय किडये (वय 29, रा़  धनजीनाका रत्नागिरी) व विनेश मधुकर चौगुले (वय 45, रा़  कसोप रत्नागिरी) अशी दोघा रिक्षाचालकांची नावे आहे़. त्यानुसार प्रथम आशिष याने तिघा पर्यटकांना गणपतीपुळे याठिकाणी नेले. 

दरम्यान संबंधित पर्यटक हे रत्नागिरीच्या दिशेने परत येत असताना त्यांनी आशिष याला प्रसाद म्हणून खाण्यास लाडू दिला होता़. लाडू खाल्ल्यानंतर आशिष हा बेशुद्ध पडला. यानंतर पर्यटक बनून आलेल्या तिघांनी त्याच्या हातातील दोन सोन्याच्या अंगठ्या, मोबाईल, एटीएम, एक तोळ्याची सोन्याची साखळी लुटून नेले. दरम्यान आशिष हा दुपारी घरी परत आला नसल्याने त्याच्या वडीलांनी शोधा शोध सुरू केली़ यानंतर तो दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास परटवणे साईमंदीर याठिकाणी बेशुद्ध अवस्थेत दिसून आला होता. त्याला तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दुसर्‍या घटनेत रिक्षाचालक विनेश मधुकर चौगुले यांना दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास गणपतीपुळेसाठी भाडे मिळाले़  तसे त्यांनी आपल्या मित्राला आपण गणपतीपुळे याठिकाणी भाडे घेवून जात असल्याचे सांगितले होते. दरम्यान सायंकाळी 5.30 वा.च्या सुमारास विनेश हा चंपक मैदान याठिकाणी बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याच्याकडील देखील सोन्याची साखळी, पाकिट, रिक्षाची चावी आदी लुटून नेल्याचे समोर आले होते. पोलिसांनी सर्व 6 संशयितांविरूद्ध भा.दं.वि. कलम 328, 379 सह 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे़. अशा प्रकारे चोरी करणारी ही टोळी सराईत असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे़  लवकरच आरोपिंना अटक करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र अद्यापही यातील आरोपी जेरबंद झालेले नाहीत. या आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची विविध पथकं वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्यात आली आहेत.