रिक्षा चालकांना गुंगीचे औषध देऊन लुटणाऱ्या टोळीतील एकाला अटक

रत्नागिरी:- रिक्षा भाड्याचा बहाणा करुन दोन रिक्षा चालकांना प्रसादाच्या नावाखाली लाडूतून गुंगीचे औषध देवून लुटणार्या  मध्यप्रदेशमधील  टोळीतील एका संशयिताला शहर पोलीसांनी गुजरात पोलीसांकडून ताब्यात घेतले आहे. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.  

दि. ११ जून रोजी दोन रिक्षा चालक रत्नागिरी शहरात बेशुद्ध अवस्थेत आढळल्यानंतर हि घटना उघड झाली होती. दि. ११ जून रोजी सकाळी ९.३० वाजण्याचा सुमारास बाजारपेठेतून दोन रिक्षा व्यायसायिकांना गणपतीपुळे येथे भाडे असल्याचे सांगून एक टोUके घेऊन गेले. त्यानंतर दोन्ही रिक्षा चालकांचा संपर्क होत नसतानाच एक रिक्षा चालक दुपारी व एक रिक्षा चालक सायंकाळी परटवणे, उद्यमनगर या  ठिकाणी रिक्षातच बेशुध्द अवस्थेत आढळून आले. यानंतर ही घटना उघड झाली होती. 

  आशिष संजय किडये ( रा. मांडवी), विनेश मधुकर चौगुले (रा. कसोप)  या दोन्ही रिक्षा चालकांच्या अंगावरील सोन्याचे दागिने टोळीतील तिघांनी लांबविले होते. त्यानंतर शहर पोलीसांनी तिघां संशयितांविरोधात गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली होती.मात्र टोळीचा थांगपत्ता लागत नव्हता. मात्र गुजरात राज्यात अशाच प्रकारे रिक्षा व्यावसायिकांना लुटणार्या टोळीला तेथील पोलीसांनी अटक केली होती. तेथील चोरीची पद्धत रत्नागिरीतील चोरी सारखीच होती. त्यानंतर शहर पोलीसांनी मध्यप्रदेश मधील एका तरुणाला गुजरात पोलीसांच्या ताब्यातून आपल्या ताब्यात घेतले आहे. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.या चोरट्याने कबुली दिल्यास रत्नागिरीसह कोकण रेल्वेतील गुन्हेही या टोळीकडून उघड होण्याची शक्यता आहे.