Monday, November 16, 2026
spot_img
Home चिपळूण मोकाट बैलाचा रिक्षाचालकावर हल्ला; शिंगावर उचलून रस्त्यावर आपटले

मोकाट बैलाचा रिक्षाचालकावर हल्ला; शिंगावर उचलून रस्त्यावर आपटले

चिपळूण:- शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाशेजारील स्वागत रिक्षा थांब्यावर मोकाट बैलाने रिक्षाचालकाला शिंगावर उचलून रस्त्यावर जोरात आपटल्याची घटना गुरुवार, १२ नोव्हेंबर रोजी घडली. या हल्ल्यात रिक्षाचालक बंड्या झगडे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर कराड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कापसाळ येथील रहिवासी बंड्या झगडे हे नेहमीप्रमाणे आपली रिक्षा स्वागत रिक्षा थांब्यावर उभी करून प्रवाशांची वाट पाहत होते. याच परिसरात फिरणाऱ्या मोकाट बैलामुळे महिला प्रवाशांना धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी बैलाला हटकण्याचा प्रयत्न केला. मात्र, बैलाने अचानक मागे वळून त्यांच्यावर हल्ला केला. बैलाने झगडे यांना थेट शिंगावर उचलून रस्त्यावर जोरात आपटले. हा प्रकार पाहताच अन्य रिक्षाचालक आणि नागरिकांनी धाव घेत त्यांची बैलाच्या तावडीतून सुटका केली.
या हल्ल्यात झगडे यांच्या छातीला, बरगड्यांना तसेच मणक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना सुरुवातीला चिपळूणमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती अधिक बिघडल्याने पुढील उपचारांसाठी कराड येथे हलविण्यात आले. त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही महिन्यांपर्यंत विश्रांती घ्यावी लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान, चिपळूण तालुका रिक्षाचालक-मालक संघटनेचे अध्यक्ष दिलीप खेतले, संजय जोशी, प्रशांत गोरिवले, राजेंद्र गुढेकर यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कराड येथील रुग्णालयात जाऊन झगडे यांची भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
शहरातील मोकाट जनावरे, गाढवे आणि श्वानांचा तातडीने बंदोबस्त करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी रिक्षा संघटनेने केली आहे. केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कारवाई करावी. येत्या काही दिवसांत नगर परिषद प्रशासनाने या प्रश्नावर ठोस पावले उचलली नाहीत, तर नगरपालिकेविरोधात उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष दिलीप खेतले यांनी दिला आहे.