राष्ट्रवादीतून सेनेत दाखल झालेल्या दोघा नगरसेवकांना सभापतीपदाची लॉटरी

निवड बिनविरोध; सेनेचेच वर्चस्व 

रत्नागिरी:- रत्नागिरी पालिकेच्या विषय समिती सभापती आणि स्थायी समिती निवडणुकीत अपेेक्षेप्रमाणे शिवसेनेने वर्चस्व राखले. या निवडीत राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत दाखल झालेल्या दोघांना संधी देण्यात आली आहे.

रत्नागिरी पालिकेच्या विषय समिती सभापती पदांची निवड प्रक्रिया सोमवारी (ता. 28) करण्यात आली. पालिकेवर शिवसेनेचे प्राबल्य असल्यामुळे निवडणुक बिनविरोध होणार अशीच शक्यता होती. वर्षभरानंतर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुक होणार असल्याने आतापर्यंत संधी न मिळालेल्यांना संधी देण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून सुरु होता. इच्छुकांचीही भाऊगर्दी होती. पालिकेतील विरोधी पक्ष भाजपकडून एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नव्हता. त्यामुळे शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज भरलेल्या सर्वच जणांची निवड बिनविरोध झाली. यामध्ये महिला व बाल कल्याण समिती सभापती सौ. कौसल्या शेट्ये, आरोग्य सभापती निमेश नायर, पाणी सभापती सौ. दिशा साळवी, नियोजन सभापतीपदी विकास पाटील तर बांधकाम सभापती राकेश नागवेकर यांचा समावेश आहे. स्थायी समितीवर नगरसेविका सौ. स्मितल पावसकर आणि मुसा काझी यांची वर्णी लागली तर भाजपकडून गटनेते समीर तिवरेकर यांना संधी दिली गेली आहे. निवडणुक पार पडल्यानंतर नगराध्यक्ष बंड्या साळवी आणि मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांनी नूतन सभापतींची अभिनंदन केले. शिवसेनेकडून संधी देताना राष्ट्रवादीतून आलेल्या दोघांचा सन्मान केला आहे. त्यामध्ये महिला व बालकल्याण सभापतीपदी कौसल्या शेट्ये तर स्थायी समितीवर मुसा काझी यांचा समावेश आहे. तसेच स्थायी समितीवर भाजपकडून ज्येष्ठ आणि अनुभवाला प्राधान्य दिले गेले.