राजापूर:- तालुक्यातील रायपाटण, टक्केवाडीमधील वृद्ध महिलेच्या खुनाचे धागेदोरे चार दिवस उलटले तरी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. आरोपी अद्यापही मोकाट असल्याने नेमका कोणत्या कारणास्तव खून झाला याचा उलगडा अद्यापही झालेला नाही. आरोपीला शोधणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.
बुधवारी रायपाटण टक्केवाडी मधील ७४ अवर्षीय महिला वैशाली शेट्ये या त्यांच्या घरी मृतावस्थेत आढळून आल्या होत्या. तेव्हापासून पोलीस तपास वेगाने सुरू असून समोर आलेल्या माहितीनुसार त्या महिलेचा खून झाल्याची लक्षात आल्यानंतर पोलिसांनी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलीस तपास वेगाने सुरु असला तरी आरोपीपर्यंत पोहोचण्यात, त्याचा माग काढण्यात पोलिसांना यश आलेले नाही.
चार दिवस राजापूर पोलीस रायपाटणमध्ये ठाण मांडून होते. मात्र ठोस पुरावे हाती लागलेले नाहीत. मयत महिलेचा मृतदेह काहीसा कुजलेल्या अवस्थेत असल्याने यावेळी पाचारण करण्यात आलेल्या श्वान पथकाला देखील आरोपीचा माग काढण्यात अपयश आले होते. गेले तीन दिवस पोलिसांनी तपास करताना अनेक बाबींची पडताळणी केली आहे. झालेला खून कोणत्या करणासाठी आणि कोणी केला त्याचा उलगडा अद्यापही झालेला नाही. पोलीस अधीक्षकांनीही यामध्ये लक्ष घातलेले आहे. मात्र अद्याप या खुनाच्या आरोपीचा शोध लागलेला नाही.