खेड:- तालुक्यातील बोरज सीमेवरील माळरान क्षेत्रात रानडुकराची शिकार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या बाबू भागोजी शिंदे (माणी, खेड) याची आणखी एक दिवस वन विभागाच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली. या प्रकरणातील दोन मुख्य सूत्रधार अजूनही पसारच आहेत. वन विभागाच्या पथकांकडून दोघांचाही कसून शोध घेण्यात आहे. दोघांच्या अटकेनंतरच अन्य कोणाचा सहभाग होता का याचा उलगडा होणार आहे.
काडवली येथे वन विभागाच्या पथकाकडून व्याघ्र गणनेचे काम सुरू असताना तिघेजण दोन रानडुक्कर मृतावस्थेत घेऊन जात असताना एकास पाठलाग करत रंगेहाथ पकडले. अन्य दोघेजण पलायन करण्यात यशस्वी झाले. ताब्यात घेतलेल्या बाबू शिंदे यांच्याकडील पिशवीत ९६ जिवंत गावठी बॉम्बही हस्तगत करण्यात आले. या शिकार प्रकरणात आणखी काहींचा सहभाग असण्याची दाट शक्यता आहे. विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली दापोली परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश पाटील, खेडचे वनपाल उदय भागवत व पथकातील कर्मचारी मुख्य सूत्रधार असलेल्या पसार संशयितांच्या मार्गावर आहेत.









