गुहागर : गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर येथे 20 इंच लांबीचे रानटी डुकरांचे 6 सुळे पोलीसांनी जप्त केले. या प्रकरणी गुहागर पोलीसांनी दोन जणांना अटक केली आहे.
रानडुकरांच्या सुळ्यांची तस्करी करताना रंगेहाथ पकडण्याची कारवाई रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच गुहागर पोलीसांनी केली आहे. गेल्या महिनाभरात जंगली प्राण्याचे अवयव व जीवंत प्राण्याची तस्करी पकडण्याची ही 5 वी घटना आहे.
गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर समुद्रकिनाऱ्यावर रानडी डुकराच्या सुळ्यांचा खरेदी विक्री व्यवहार पूर्ण करायला दोन व्यक्ती येणाऱ्या असलीची गुप्त माहिती पोलीसांपर्यत पोचली होती. त्यामुळे गुहागर पोलीसांनी वेळणेश्र्वर समुद्रकिनाऱ्यावर सापळा रचला होता. सकाळी 10.15 च्या सुमारास दोन व्यक्ती वेळणेश्र्वर समुद्रकिनाऱ्यावर आल्या. त्यांच्या हालचाली पाहून पोलीसांचा संशय बळावला. त्यामुळे पोलीसांनी दोघांना अडवले. त्यांची चौकशी करुन अंगझडती घेतली. तेव्हा 20 इंच लांबीचे 6 रानटी डुकरांचे सुळे पोलीसांना मिळाले. वन्य जीव हाताळण्याचा कोणताही परवाना त्यांच्याकडे सापडला नाही. त्यामुळे पोलीसांनी या दोन्ही व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. दिलीप महादेव बिर्जे (वय 51, रा. साखरीआगर) आणि प्रणव विलास गडदे (वय 38, रा. हेदवी) अशी या दोघांची नावे आहेत.
ही कारवाई गुहागरचे प्रभारी पोलीस निरीक्षक बी. के. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल कादवडकर, पोलीस नाईक विशाल वायंगणकर, एस एस नाटेकर, पोलीस कर्मचारी वैभव चौगुले, प्रथमेश कदम, राहुल फडतरे यांनी केली. सदर विषय वन खात्याच्या अखत्यारीत येत असल्याने तातडीने पोलीस निरीक्षक बी. के. जाधव यांनी वन विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर वन विभागाचे गुहागरचे वनपाल संतोष परशेट्ये, वनरक्षक मांडवकर व दुंडगे वेळणेश्र्वर मध्ये आले. त्यांनी सदर सुळे हे कृत्रिम नसल्याची खात्री केली. तसेच पंचनामा करण्यासाठी पोलीसांना सहकार्य केले.
रानडुकरांचे 20 इंच लांब सुळ्यांची तस्करी करताना पकडण्याची ही घटना रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली आहे. सदर सुळे हे पिशाच्च बाधा घालविण्यासाठी व गुप्तधनाच्या शोधासाठी वापरले जातात. त्यामुळे बाजारात या सुळ्यांना मोठी किंमत मिळते. त्यामुळे रानडुकरांच्या सुळ्यांचीही तस्करी केली जाते. असे चौकशीत समोर आले आहे.