रानकोंबड्यांची शिकार करणारे दोघे ताब्यात

दापोलीत वन विभागाची कारवाई; बंदूक जप्त

दापोली:- रानकोंबड्याची शिकार करणे दोघांना महागात पडले असून, वन विभागाने या दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडील बंदूक जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई कुंभवे येथे करण्यात आली.

वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराच्या घराच्या पाठीमागील बाजूला रानकोंबड्याची शिकार झाल्याचे वन अधिकाऱ्यांना कळविण्यात आले. त्यानुसार वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन वस्तुस्थितीची पाहणी केली. तक्रारदाराच्या घराच्या पाठीमागील बाजूस १०० मीटर अंतरावर असणारे झाडेकर यांच्या घराकडे दोघे जण रान कोंबड्याची शिकार करून घेऊन गेल्याचे तक्रारदारांनी दाखविले. त्यानुसार पडवीमध्ये जावून पाहणी केली असता त्या ठिकाणी संशयित नितीन शांताराम झाडेकर (वय ३४, रा. कुंभवे, दापोली), आशिष अशोक पेडमकर (३२, रा. वाकवली, दापोली) हे जखमी अवस्थेतील रानकोंबडा व छऱ्याच्या बंदुकीसह आढळून आले. त्यांच्यावर वन्यजीव (संरक्षण) कायद्यान्वये गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले.

ही कारवाई परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश पाटील, वनपाल रामदास खोत, वनरक्षक श्रीमती शुभांगी भिलारे, सूरज जगताप, वि. द. झाडे, शुभांगी गुरव आदींनी केली.