रत्नागिरी:- महाराष्ट्रातून होणार्या निर्यातीपैकी रत्नागिरी जिल्ह्याचा वाटा अवघा 1.35 टक्के इतकाच असल्याची माहिती पुढे आली आहे. आंबा, काजू आणि मासळीतील उत्पादनावर अर्थव्यवस्था अवलंबून असली तरीही जिल्ह्यातून सर्वाधिक निर्यात ही खते, किटकनाशके आणि केमिकलचीच होत आहे. स्थानिक उत्पादनांची थेट निर्यात वाढविण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासह निर्यातदार उभे करण्याचे आव्हान प्रशासनासह लोकप्रतिनिधींपुढे आहे.
आंबा, काजू आणि मच्छी या व्यावसायावर अर्थव्यवस्था अवलंबून आहे, अशी रत्नागिरी जिल्ह्याची ओळख; मात्र जिल्ह्यात उत्पादीत केल्या जाणारी खते, किटकनाशके, विविध प्रकारची केमिकल यांची निर्यात मोठ्याप्रमाणात होत आहे. सर्वाधिक निर्यात ही समुद्र मार्गे केली जाते. त्यासाठी जेएनपीटी बंदराचा सर्वाधिक वापर केला जातो. परंतु रत्नागिरी तालुक्यात जिंदल, आंग्रे पोर्ट ही मोठी खासगी बंदरे उभारण्यात आल्यानंतर काही अंशी खासगी निर्यातीला वाव निर्माण झाला आहे. लोटे एमआयडीसीत उत्पादीत होणारी खते, किटकनाशके यासह केमिकल्सची उत्पादने निर्यात केली जात आहेत. जिल्हा उद्योग केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातून सुमारे तिन हजार कोटी रुपयांची निर्यात वर्षाला होत आहे. आंबा फळ आणि पल्पची 58 कोटीची तर काजूची 28 कोटीची रत्नागिरीतून थेट निर्यात केली जाते. त्याचबरोबर मासे आणि प्रक्रिया केलेले मत्स्य पदार्थांची सुमारे 2800 कोटीची निर्यात होते. आंबा, काजूची निर्यात ही मुंबईतील बाजारपेठांमधून होत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या तुलनेत जिल्ह्यातून तुलनेत 1.35 टक्केच निर्यात होत आहे. स्थानिक उत्पादनांचा टक्कासुविधांसह स्थानिक निर्यातदारांचा अभाव ही निर्यात कमी असल्याची मोठी कारणे आहेत.









