रत्नागिरी:- दोन मुलाना मारणाऱ्या चार मारेकऱ्यांच्या तावडीतून मुलांना सोडविण्यासाठी गेलेल्या आईलाच त्या मारेकऱ्यांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. यावेळी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र आणि १० हजार रुपयाचे असलेला बटवा हिस्कावून नेण्यात आल्याची तक्रार शहर पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे. यावरून पोलिसांनी चौघा संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
नूरजहॉं मुजीब पावसकर (रा. राजिवडा) असे तक्रार दिलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, इनायत युसुफ मुल्ला, मुबीन युसुफ मुल्ला, मुस्तकीन युसुफ मुल्ला, तन्वीर युसुफ मुल्ला (रा. राजिवडा) अशी संशयितांची नावे आहेत. यातील दोन संशयितांनी माजी नगरसेवक अब्दुल बिजली खान व त्यांच्या मुलाला मारहाण केली होती. हे चारही संशयित गावातील मच्छीमार्केट येथे एका तरुणाला मारहाण करत होते. त्यावेळी तक्रारदार महिलेची मुलं इबादुल्ला व कदर हे भांडण सोडविण्यासाठी गेले. त्यांनाही संशयितांनी मारहाण केली. तेथील मच्छीमार्केट येथे मासे विक्री करण्यासाठी बसलेल्या नूरजहॉं पावसकर यांनी त्यांच्या मुलांना चौघेजण मारत असल्याचे कळताच संशयितांच्या तावडीतून मुलांना सोडविण्यासाठी त्या तेथे गेल्या. त्या चौर संशयितांनी त्यांनाही मारहाण केली. यावेळी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळुसत्र आणि १० हजार रुपये असलेला बटवा हिसकावून लंपास करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.









