राजिवडा येथे दुचाकी घसरल्याच्या रागातून मारहाण

रत्नागिरी:- शहरातील राजिवडा-जामामशीद रस्त्यावर दुचाकी घसरल्याच्या रागातून शिवीगाळ व मारहाण करणाऱ्या दोघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शवाफ नजीर कोतवडेकर व जुमेर सऊद वस्ता (दोघेही रा. जामा मशीद जवळ, राजिवडा, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना मंगळवारी (ता. ५) रात्री साडेआठच्या सुमारास जामा मशीद रस्त्यावर घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी मोहम्मद जैनुद्दीन वस्ता (४२, रा. राजिवडा, रत्नागिरी) हे त्यांच्या पत्नीची वाट बघत रस्त्यावर उभे होते. त्यावेळी समोरुन येणाऱ्या संशयितांची दुचाकी रस्त्यावरुन घसरली. फिर्यादी व त्यांची पत्नी रस्त्यावर उभे असल्याचा गैरसमज करुन संशयितांनी फिर्यादी मोहम्मद वस्ता यांना संशयित शवाफ कोतवडेकर याने हाताच्या ठोशाने व जुमेर वस्ता याने दगडाने मारहाण केली. या प्रकरणी वस्ता यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली तक्रारीवरुन पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.