राजापूर भालावली येथे दोन महाविद्यालयीन तरुणींवर प्राणघातक हल्ला; एक ठार, एक तरुणी गंभीर

राजापूर:- राजापूर तालुक्यातील भालावली येथे दोन कॉलेजवयीन मुलींवर दबा धरुन बसलेल्या एका वृद्धाने प्राणघातक हल्ला करुन एका मुलीला ठार केल्याची घटना घडली असून एक मुलगी गंभीर जखमी आहे. 

साक्षी मुकुंद गुरव (20, गुरववाडी) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. तर दुसऱ्या गंभीर जखमी मुलीला रत्नागिरी सिव्हील हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सिद्धी संजय गुरव (21, गुरववाडी, राजापूर) असे गंभीर जखमी मुलीचे नाव आहे. या घटनेने राजापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. विनायक शंकर गुरव (55, वरची गुरव वाडी) असे हल्लेखोराचे नाव आहे.

 सविस्तर वृत्त असे की, भालावली सिनियर कॉलेज धारतले येथील कॉलेजमधून साक्षी आणि सिद्धी दुपारी १२ वा सुमारास घरी जात असताना जंगलमय भागात दबा धरुन बसलेल्या विनायकने दोन्ही मुलींवर बांबूने जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात साक्षी हीचा जागीच मृत्यू झाला. ती सिद्धी हिच्यावर होत असलेल्या हलल्याचा प्रतिकार करत होती. मात्र तिला आपला जीव गमवावा लागला. गंभीर जखमी सिद्धीला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हल्ला करुन तरुण पळून गेला असून त्याचा शोध सुरु आहे. या घटनेची माहिती कळताच ग्रामस्थांनी धाव घेतली. जखमी मुलीला रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पंचनामा सुरु आहे.

 दरम्यान गावातीलच वृद्धाने पूर्ववैमनस्यातून आणि घरातील वादातून हा हल्ला केल्याचे बोलले जात आहे.