कॅनिंगला 50 रुपयांचा दर, सारथीचे विभागीय कार्यालय रत्नागिरीत
रत्नागिरी:- “सरकार जनतेच्या भावनांशी खेळणार नाही, तर जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील,” असा स्पष्ट संदेश देत रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी नाणार बॉक्साईड प्रकल्पाची बहुचर्चित जनसुनावणी रद्द करण्याची घोषणा केली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या मॅरेथॉन बैठकीत नाणार प्रकल्प, आंबा बागायतदारांचे प्रश्न आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी ‘सारथी’चे कार्यालय अशा तीन महत्त्वाच्या विषयांवर मोहोर उमटवण्यात आली.
नाणार आणि परिसरातील १०० टक्के खातेदार आणि शेतकऱ्यांनी बॉक्साईड प्रकल्पाच्या विरोधात आपला कौल दिला होता. स्थानिक आमदार किरण सामंत आणि पंचायत समितीनेही या प्रकल्पाला विरोध दर्शवला होता. लोकभावना लक्षात घेऊन प्रशासनाने २० आणि २८ मे रोजी होणारी जनसुनावणी अधिकृतपणे रद्द केली आहे. “शेतकरी आणि बागायतदारांचा विरोध असताना केंद्र सरकारचा कोणताही प्रकल्प लादला जाणार नाही,” अशी ठाम भूमिका सामंत यांनी यावेळी मांडली.
आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेत पालकमंत्र्यांनी कॅनिंग कंपन्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली. यामुळे आतापर्यंत ३२ रुपये किलोने खरेदी केला जाणारा आंबा आता थेट ५० रुपये किलोने खरेदी करण्याचा निर्णय ‘एक्झोटिक’ कंपनीने घेतला आहे. तसेच, कर्नाटकचा आंबा ‘रत्नागिरी हापूस’ म्हणून विकणाऱ्यांची गय केली जाणार नाही. यासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली विशेष ‘भरारी पथक’ तैनात करण्यात आले असून, फसवणूक करणाऱ्यांच्या गाड्या थेट सील केल्या जाणार आहेत.
जिह्यातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ‘सारथी’चे विभागीय कार्यालय रत्नागिरीत सुरू करण्याच्या सूचना व्यवस्थापकीय संचालक महेश पाटील यांना देण्यात आल्या आहेत. या कार्यालयामुळे संबंधित लाभार्थी विद्यार्थ्यांना विविध योजनांचा लाभ स्थानिक पातळीवर मिळेल. तसेच, सारथीशी संबंधित विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रशिक्षण त्वरित सुरू करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या असून, या प्रस्तावाबाबत शासन सकारात्मक असल्याचे सामंत यांनी सांगितले.
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून, गेल्या दोन वर्षांतील प्रलंबित ७ कोटी रुपयांची मदत येत्या चार-पाच दिवसांत लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होईल. रत्नागिरी नगरपालिकेची नवीन इमारतही लोकार्पणासाठी सज्ज असून, डिसेंबरपर्यंत सर्व शासकीय कार्यालये एकाच छताखाली आणण्याचे नियोजन पालकमंत्र्यांनी जाहीर केले आहे.
भाजप नेते प्रमोद जठार यांच्या ‘शत-प्रतिशत भाजप’ या घोषणेवर बोलताना सामंत यांनी त्यांच्याच शैलीत ‘होय बाळांनो’ म्हणत टोला लगावला. जठार साहेबांवर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची मोठी फळी आहे, आमदार झाल्यानंतर पंधरा दिवस आधी वातावरण निर्माण करावे लागते, म्हणून ते सध्या फिरत आहेत, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असे सामंत म्हणाले. तसेच, “पूर्वीच्या लोकांनी जिल्ह्यात भाजप वाढवली नाही” यावर जठार यांनी आपल्या विधानातून शिक्कामोर्तब केल्याची कोपरखळीही त्यांनी मारली.









