राजापूर पाठोपाठ रत्नागिरीतील आरे गावातील भैरी मंदिरातील दानपेटी फोडली; चोरटा सीसीटीव्हीत कैद

रत्नागिरी:- राजापूर तालुक्यातील तीन मंदिरातील दानपेट्या फोडून धुमाकूळ घालणाऱ्या चोरट्याने रत्नागिरी तालुक्यात देखील चोरी केली आहे. राजापूर नंतर तालुक्यातील आरे गावातील भैरी मंदिरातील दानपेटी चोरट्याने बुधवारी मध्यरात्री फोडली. चोरटा चोरी करत असताना सीसीटीव्हीत कैद झाला असून त्याची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आल्याचे समजते.
 

मंदिरातील दानपेटया फोडण्याचा सिलसिला चोरट्याने सुरू केला आहे. दोन दिवसांपूर्वी राजापूर तालुक्यातील साखर, करेल आणि अणसुरे अशा तीन गावांच्या मंदिरातील दानपेट्या चोरट्याने एकाच रात्रीत फोडल्या होत्या. ही तीनही मंदिरे पाच किलोमीटर परिसरात असल्याने चोरट्याने एका मागोमाग एक तीनही मंदिरात चोरी केली.
 

राजापूर नंतर चोरट्याने रत्नागिरी तालुक्याकडे आपला मोर्चा वळवला आहे. रत्नागिरीतील आरे गाव येथील प्रसिद्ध भैरी मंदिरात चोरट्याने चोरी केली. बुधवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मंदिराला असलेल्या छोट्या खिडकीतून चोरट्याने मंदिरात प्रवेश केला. यानंतर हत्यारांच्या साहाय्याने चोरट्याने मंदिरातील दानपेटी फोडत दानपेटीतील रोख रक्कम चोरून नेली. मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरा असल्याने चोरीची ही घटना कैद झाली असून ग्रामीण पोलिसांनी चोरट्याची ओळख पटवल्याचे वृत्त आहे.