राजापूर गोठिवरे येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरी

राजापूर:- तालुक्यातील नाटे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोठिवरे (बुरंबे) येथे एका बंद घराचे कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्याने घरातून झाड कापण्याच्या मशीनचे साहित्य आणि स्वयंपाकाची भांडी असा एकूण ३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी नाटे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रसिका रविंद्र रासम (वय ५७, सध्या रा. डोंबिवली, मूळ रा. गोठिवरे) यांचे गोठिवरे येथील घर दिनांक ९ डिसेंबर ते २१ डिसेंबर या कालावधीत बंद होते. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने बंद घराच्या मुख्य दरवाजाच्या कडी-कोयंड्याचे स्क्रू एका पाण्याच्या सहाय्याने काढून घरात प्रवेश केला. विशेष म्हणजे चोरी केल्यानंतर चोरट्याने तो पाना घराबाहेरील बेसिनमध्ये ठेवून पोबारा केला.

चोरट्याने घरातून ‘स्टिल एम एस’ कंपनीचे झाडे कापण्याच्या चेन सॉ मशीनचे ब्लेड, मशीनची चेन आणि स्वयंपाक बनविण्याचे साहित्य असा एकूण ३ हजार रुपयांचा माल चोरून नेला आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर रसिका रासम यांनी २२ डिसेंबर रोजी नाटे पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३०५(C), ३३१(३) आणि ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल केला असून अधिक तपास नाटे पोलीस करत आहेत.