राजापूरातील दीपक गुरव खून प्रकरणाचा छडा; संशयित आरोपीला बेड्या

राजापूर:- तालुक्यातील केळवडे येथे बंदूकीची गोळी लागून मृत्यु झालेल्या दिपक उर्फ बाबू राजाराम गुरव (४५) याच्या मृत्यू प्रकरणाचा तपास लावण्यात राजापूर पोलीसांना यश आले आहे. या प्रकरणी राजापूर पोलीसांनी केळवडे गावातील संजय उर्फ बंडया महादेव मुगे याला अटक केली आहे. संशयीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती राजापूर पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांनी दिली.

तालुक्यातील केळवडे गावाच्या जवळील जंगलामध्ये दिपक उर्फ बाबू राजाराम गुरव हे शुक्रवार दिनांक ४ फेब्रुवारी रोजी गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला होते. त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला होता. दिपक याला प्रारंभी उपचाराकरीता सिंधुदुर्ग येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते . दिपक यांच्यावर सिंधुदुर्ग येथील रुग्णालयात उपचार सुरु असताना वैद्यकिय तपासणीत दिपक यांच्या डोक्यात बंदुकीचे छरे असण्याची शक्यता वर्तविली होती . त्यावेळी सदर प्रकरणाबाबतची माहिती सिंधुदुर्ग पोलीसांनी राजापूर पोलीसांना दिली. राजापूर पोलीसांनी घातपाताची शक्यता लक्षात घेऊन तात्काळ याबाबत दिपक याला गंभीर जखमी अवस्थेत पहाणाऱ्या एका महिलेच्या फियादीवरून अज्ञात इसमाविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. यानंतर गंभीर जखमी दिपक यांना अधिक उपचारासाठी सिंधुदुर्ग येथून रत्नागिरी येथे उपचारार्थ नेत असताना त्यांचा रत्नागिरी येथील रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. त्यामुळे राजापूर पोलीसांनी प्रारंभी भा. द. वि. कलम ३०७ व दिपक याचा मृत्यु झाल्याने भा. द. वि. कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला.
 

या प्रकरणी पोलीसांनी केळवडे गावातील देवस्थानावरून वाद सुरू असलेल्या दोन्ही गटांतील अनेकांना चौकशीसाठी पाचारण करून चौकशी सुरू केली होती. तर या घटनेनंतर पोलीसांनी कोदवली, केळवडे, शिळ या ठिकाणी छापे टाकून विनापरवाना बंदूकाही जप्त करून काहींना अटक केली होती. आणि याच दरम्यान पोलीसांना संशयीत आरोपीपर्यंत पोहचण्यात यश आल्याचे परबकर यांनी सांगितले.
जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ मोहीतकुमार गर्ग, उपविभागिय पोलीस अधिकारी श्रीनिवास साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांचेकडे सोपवून सदर गुन्ह्याच्या तपासकामी जिल्ह्यातील इतर अधिकारी व अंमलदार यांची पाच तपास पथके तयार केली व सदर तपास पथकांना घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने माहीती घेऊन , पुरावे प्राप्त करणे व आरोपीचा शोध घेण्याचे काम सोपविण्यात आले. गुन्ह्याचे घटनास्थळ हे डोंगराच्या उतारावरील जंगलमय भागातील निर्जन स्थळी असल्याने तसेच गुन्ह्याच्या घटनास्थळी कोणताही पुरावा मिळून येत नसल्याने , सदर गुन्ह्याचा तपास करण्याचे आव्हान पोलीसांसमोर होते. या गुन्ह्यात बळी गेलेल्या इसमास बंदुकीची गोळी लागल्याने , पोलीसांनी घातपाताच्या दृष्टीने तपास करीत , घटनास्थळाच्या आसपासच्या गावातील बंदुक बाळगणाऱ्या लोकांची माहिती घेऊन , सदर संशयीत लोकांना पोलीस ठाणेस आणून त्यांचेकडे प्रत्यक्ष चौकशी करणे सुरु केले . त्यामध्ये केळवडे गावातीलच वरच्यावाडीमध्ये रहाणारा संशयीत इसम संजय उर्फ बंडया महादेव मुंगे याचेकडे एक काडतूसीची बेकायदेशीर बंदुक असल्याची खात्रीशीर माहीती पोलीसांना मिळाली त्यानंतर राजापूर पोलीसांनी संशयीत इसम संजय उर्फ बंडया महादेव मुगे यास पोलीस ठाण्यात आणून त्याच्याकडे चौकशी केली असता तपासामध्ये त्याच्याकरील संशय बळावल्याने पोलीसांनी पुरावे प्राप्त करीत , एक एक दुवा जोड़त कौशल्यपूर्ण तपास करुन सदरचा गुन्हा हा संशयीत इसम संजय उर्फ बंडया महादेव मुंगे यानेच केल्याचे निष्पन्न केले . त्यानंतर संशयीत संजय उर्फ बंडया महादेव मुगे याने देखील गुन्ह्याची कबुली देत , सदरचा गुन्हा आपणच आपल्याकडील काडतूसीच्या बेकायदेशीर बंदुकीने केल्याचे सांगितल्याची माहिती तपास अधिकारी परबकर यांनी पत्रकारांना दिली.
या प्रकरणी संजय उर्फ बंडया महादेव गुगे यास दाखल गुन्हयामध्ये अटक करण्यात आले असून त्याला राजापूर न्यायालायसमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला १४ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याचे परबकर यांनी सांगितले.

जिल्हा पोलीस अधिक्षक . डॉ . मोहीतकुमार गर्ग, अपर पोलीस अधिक्षक रत्नागिरी श्रीमती जयश्री देसाई , परिविक्षाधीन सहाय्यक पोलीस अधिक्षक एस . ऋषीकेश रेड्डी , यांच्या सुचना व मार्गदर्शना प्रमाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी , लांजा श्रीनिवास साळोखे यांच्या नेतृत्वाखाली परबकर यांच्यासह राजापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुकर मौळे , नाटेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील पोलीस, रत्नागिरी ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर सूर्य , रत्नागिरी सायबर सेलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वानी, मनोज भोसले, विनायक नरवणे इत्यादी अधिकारी व कर्मचारी यांनी या तपास कामी महत्वाची भुमिका बजवली आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर हे अधिक तपास करत आहेत.