राजापूरमध्ये खैर चोरी प्रकरणी सात जणांवर गुन्हा

राजापूर:- तालुक्यातील तळगाव वाकिरले येथे फिर्यादीच्या मालकीच्या जमिनीतील नऊ खैर वृक्षांची परवानगी न घेता तोड करून चोरी केल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १ फेब्रुवारी २०२५ ते ७ एप्रिल २०२५ दरम्यान घडली. याप्रकरणी सुधाकर महादेव लाड (वय ५५, सध्या रा. मुंबई) यांनी १६ एप्रिल २०२५ रोजी राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विलास धाकु सावंत, भुषण विलास सावंत, त्यांचे कामगार गंगाराम रघुनाथ सावंत, तेजस अजित पोटफोडे, सर्वेश किशोर पोटफोडे, उमाजी महादेव सौंदळकर आणि तुकाराम महादेव सौंदळकर (सर्व रा. तळगाव, ता. राजापूर) यांनी संगनमत करून फिर्यादी सुधाकर लाड यांच्या मालकीच्या जमिनीतील सुमारे ४० हजार रुपये किंमतीची नऊ खैरची झाडे कोणतीही परवानगी न घेता तोडून चोरून नेली.

फिर्यादी सुधाकर लाड हे सध्या मुंबई येथे वास्तव्यास आहेत. त्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०३ (२) आणि ३ (५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास राजापूर पोलीस करत आहेत.