राजापुरात सव्वा लाखाची गोवा बनावटीची दारू जप्त

मुद्देमालासह एकाला घेतले ताब्यात, गुन्हा दाखल

राजापूर:- राजापूर पोलिसांनी शहरातील बौद्धवाडीत रविवारी सुमारे १ लाख १५ हजार ९२० रुपये गोवा बनावटीची दारू भरलेले ६७ बॉ क्स तर ५ लाख रुपये किंमतीची क्रेटा गाड़ी – जप्त केली. या प्रकरणी राजापूर पोलिसांनी संशयित आरोपी रोहित अंबाजी इंगळे (राजापूर-बंगलवाडी) याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती राजापूर पोलिसांनी दिली.

राजापूर एसटी डेपोसमोरही यापूर्वी पोलिसांनी अशाप्रकारे गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेत कारवाई केली होती. राजापूर शहरातील बौद्धवाडी भागात गोवा बनावटीच्या दारूचे बॉक्स भरलेली कार उभी असल्याची गोपनीय माहिती राजापूर पोलिसांना मिळाली होती.

पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे, दीपज्योती पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी अनिल केसकर, प्रथमेश वारिक, डिगंबर शेलार, पोलीस वाहन चालक हर्षद मुल्ला यांच्या पथकाने रविवारी दुपारी १ वाजता ही धडक कारवाई केली. कारवाईत पोलिसांनी सुमारे १ लाख १५ हजार ९२० रुपये किंमतीची गोवा बनावटीची दारू असलेले ६७ बॉक्स तसेच सुमारे ५ लाख रुपये किंमतीच्या क्रेटा कारसह (एमएच०५-इऐ ०६६१) एकूण ६ लाख १५ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल व संशयिताला ताब्यात घेतले. या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राजापूर पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे सर्वत्र स्वागत होत आहे.