राजापुरात ‘राज्य उत्पादन शुल्क’च्या कारवाईत अडीच कोटींचा मुद्देमाल जप्त

राजापूर:- गोवा राज्यातून मुंबईच्या दिशेने होणाऱ्या अवैध मद्य तस्करीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठा प्रहार केला आहे. राजापूर तालुक्यातील पन्हाळे तर्फे सौंदळ येथे भरारी पथकाने केलेल्या धडक कारवाईत गोवा बनावटीचा सुमारे २ कोटी ३६ लाख रुपयांचा मद्यसाठा आणि कंटेनर ट्रक जप्त केला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला गोव्यातून मुंबईकडे मोठ्या प्रमाणावर अवैध मद्याची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूर तालुक्यातील पन्हाळे तर्फे सौंदळ येथील निनादेवी मंदिरासमोर उत्पादन शुल्क विभागाने सापळा रचला. १ सप्टेंबर रोजी येथे पाळत ठेवून त्यांनी संशयास्पद वाटणारा (आरजे.१४.जीके.९४६४) क्रमांकाचा दहाचाकी कंटेनर ट्रक अडवला.

या ट्रकची तपासणी केली असता, त्यात तब्बल १८६६ बॉक्स गोवा बनावटीचे विदेशी मद्य आढळून आले. या संपूर्ण दारूसाठ्यासह ट्रक असा एकूण २ कोटी ३६ लाख ७२ हजार २८० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी ट्रक चालक आसिफ आस मोहम्मद याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ च्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य, मुंबईचे आयुक्त राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार आणि सहआयुक्त प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत निरीक्षक रियाज खान आणि विजयकुमार थोरात यांच्यासह दुय्यम निरीक्षक एस.आर.गायकवाड, एस.एस.गोंदकर, जवान अमोल चौगुले, चंदन पंडीत, निलेश तुपे आणि चालक मलिक धोत्रे यांचा सहभाग होता. पुढील तपास दुय्यम निरीक्षक एस.आर.गायकवाड करत आहेत.
या गुन्ह्यात आंतरराज्यीय टोळीचा सहभाग असण्याची शक्यता असून, महाराष्ट्र शासनाचा मोठ्या प्रमाणावर महसूल बुडवणाऱ्या या टोळीचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणात आणखीही काही मोठे धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अवैध मद्यनिर्मिती, विक्री किंवा वाहतुकीबाबत कोणतीही तक्रार असल्यास उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांक १८०० ८३३ ३३३३ वर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.