राजापुरात भरदिवसा चोरी; महिलेने लांबविले दोन लाखांच्या दागिन्यांसह रोकड

राजापूर:- राजापूर शहरातील मच्छी मार्केट परिसरातील हलीमा मंझिल येथे एका घरामध्ये चोरीची घटना घडली आहे. फिर्यादीच्या ओळखीच्याच एका महिलेने विश्वासाचा फायदा घेत घरातून सोन्याचे मंगळसूत्र, चांदीचे पैजण आणि रोख रक्कम असा एकूण २ लाख ५ हजार ३३१ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी राजापूर पोलिसांनी आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मृणाली मनोहर बाईत (वय ३८, रा. शिळ, सध्या रा. हलीमा मंझिल, राजापूर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. १५ डिसेंबरच्या संध्याकाळी ७:३० ते १६ डिसेंबरच्या सकाळी ९:३० या दरम्यान ही चोरीची घटना घडली. संशयित आरोपी उषा तांबे (रा. पडवे, ता. राजापूर) ही फिर्यादीच्या घरी आली होती. यावेळी तिने फिर्यादीची संमती न घेता, लबाडीच्या इराद्याने स्वतःच्या फायद्यासाठी घरातील मौल्यवान वस्तू असलेली पर्स चोरून नेली.

​सोन्याचे मंगळसूत्र: ३४.४४० ग्रॅम वजनाचे काळे मणी असलेले मंगळसूत्र, चांदीचे पैजण: ३ भार वजनाचे जोड, २०,००० रुपयेरोख रक्कम असा एकूण मुद्देमाल २,०५,३३१ रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला.

​फिर्यादी मृणाली बाईत यांनी दिलेल्या तक्रारीवरून राजापूर पोलिसांनी आरोपी उषा तांबे हिच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) अन्वये चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. ओळखीच्या व्यक्तीनेच अशा प्रकारे चोरी केल्याने परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून चोरीला गेलेला माल हस्तगत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.