राजापुरात बांधकामाच्या वादातून महिलेला मारहाण

परस्पर विरोधी तक्रारी, 6 जणांवर गुन्हा

राजापूर:- तालुक्यातील सौंदळ बारेपाडी येथे वडिलोपार्जित घराच्या बांधकामावरून झालेल्या वादात एका महिलेला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी दोन महिला आणि ज्ञानेश्वर दत्ताराम बारे ( ४८, सर्व रा. सौंदळ बारेपाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला यांचे सौंदळ बारेपाडी येथे १९६६ पासून वडिलोपार्जित घर होते. ते घर मोडकळीस आल्याने फिर्यादी यांनी सुमारे तीन महिन्यांपूर्वी ते कोसळून नवीन घर बांधण्यास सुरुवात केली आहे. या बांधकामावरून आरोपींनी राजापूर न्यायालयात दावा दाखल केला आहे, जो सध्या न्यायप्रविष्ट आहे.

१४ मे रोजी या केसची राजापूर कोर्टात तारीख होती. त्यानंतर फिर्यादी यांच्या वकिलांनी त्यांना घराचे काम सुरू करण्यास सांगितले. त्यानुसार, १५ मे रोजी फिर्यादी यांनी घराचे काम सुरू केले. याचा राग मनात धरून आरोपी क्रमांक १ ते ३ घटनास्थळी आले आणि त्यांनी फिर्यादी व साक्षीदारांना शिवीगाळ केली.

आरोपी दोन महिला आणि ज्ञानेश्वर दत्ताराम बारे यांनी फिर्यादी यांना धक्काबुक्की केली. आरोपी महिलेने दगडाने फिर्यादी यांच्या उजव्या पायाच्या नळीवर मारले आणि उजव्या हाताच्या दंडावर चावा घेतला. आरोपी एका महिलेने लाकडी काठीने कमरेवर मारून दुखापत केली. तसेच, घराचे काम सुरू केल्यास परत येऊन मारण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिली, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

दुसऱ्या बाजूने महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, सौदळ बारेवाडी येथे न्यायालयाचा ‘जैसे थे’ चा आदेश (स्टे) असताना बांधकाम सुरू केल्याने विचारणा करणाऱ्या महिलेला आणि साक्षीदारांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी दोन महिला आणि काशिराम रघनाथ माटल (वय ६०, सर्व रा. सौदळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या वडिलोपार्जित जमिनीवर आरोपींनी सुमारे तीन महिन्यांपूर्वी घर बांधण्याच्या कामाविरोधात राजापूर न्यायालयात दावा दाखल केला होता. हा दावा न्यायप्रविष्ट असून न्यायालयाने आरोपींना बांधकामासाठी ‘स्टे’ दिला आहे.
असा असतानाही, १५ मे २०२५ रोजी दुपारी १२.४५ ते १.०० वाजेच्या दरम्यान आरोपींनी पुन्हा बांधकाम सुरू केले. फिर्यादी आणि साक्षीदार यांनी घटनास्थळी जाऊन आरोपींना न्यायालयाच्या परवानगीशिवाय काम का सुरू केले, अशी विचारणा केली.
यावेळी आरोपींनी फिर्यादी आणि साक्षीदारांना शिवीगाळ केली. त्यापैकी आरोपी क्रमांक १ आणि २ या दोन महिलांनी त्यांना धक्काबुक्की केली, तर आरोपी क्रमांक ३, काशिराम माटल याने त्याच्या हातातील लाकडी काठीने साक्षीदाराच्या उजव्या हाताच्या मनगटावर मारून दुखापत केली. तसेच, आरोपींनी त्यांना पुन्हा तिकडे आल्यास सोडणार नाही, अशी धमकी दिली, असे फिर्यादी यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

या घटनेची तक्रार १५ मे २०२५ रोजी सायंकाळी १९.२४ वाजता राजापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.