राजापूर:- तालुक्यातील तेरवण थोरलीवाडी येथे विहिरीचे पाणी वापरण्यावरून झालेल्या वादातून सख्ख्या भावाने आणि वहिनीने मिळून एकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात फिर्यादी रवींद्र यशवंत खानविलकर (५६) हे जखमी झाले असून, राजापूर पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना २ मे रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्यादी रवींद्र खानविलकर यांनी स्वतः बांधलेल्या विहिरीचे पाणी त्यांचे सख्खे भाऊ मोहन खानविलकर आणि वहिनी सुवर्णा खानविलकर हे आपल्या घराच्या बांधकामासाठी वापरत होते. रवींद्र खानविलकर यांनी अंगणात येऊन त्यांना पाणी वापरण्यास मनाई केली. याचाच राग मनात धरून आरोपींनी त्यांच्यावर हल्ला चढवला.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मोहन यशवंत खानविलकर (वय ६५) याने हातातील लोखंडी कटावणीने रवींद्र यांच्या डोक्यात प्रहार करून त्यांना जखमी केले. त्याचवेळी आरोपी सुवर्णा मोहन खानविलकर (वय ५५) हिने लाकडी दांडक्याने त्यांच्या डोक्यावर आणि डाव्या हातावर मारहाण केली. आरोपींनी केवळ शारीरिक इजाच केली नाही, तर “तुझा जीवच घेतो” अशी धमकी देत शिवीगाळ केली. तसेच रवींद्र यांच्या मोबाईलवर दगड मारून त्याचे नुकसानही केले.
या प्रकरणी रवींद्र खानविलकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून राजापूर पोलिसांनी सायंकाळी ५:४५ वाजता भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ११८(१), ३५१(१), ३५२, ३२४(४)(५) आणि ३(५) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.









