राजापुरात दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ; नाटेत दुचाकीची चोरी

राजापूर:- राजापूर तालुक्यात दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून कोंड्ये, राजापूर पाठोपाठ आता नाटे येथून एक दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. तुषार एकनाथ आडिवरेकर यांनी या प्रकरणी नाटे पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तुळसुंदे, उगवतीवाडी येथील तुषार आडिवरेकर हे दि. २६ रोजी रात्री आपल्या ताब्यातील होंडा सीबी शाईन मोटार सायकल घेवून नाटे येथे बोटीवर कामाला जाणेसाठी आलेले होते. सदरची मोटारसायकल त्यांनी नाटे चिंचबंदर, जुनीतर येथे रस्त्यांच्या साईटला लावून बोटीवर तांडेल म्हणून गेले. त्यानंतर दि. २७ रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास हवामान खराब झाल्याने पुन्हा नाटे डुंगेरी जेट्टी येथे आले व घरी जाणेसाठी मोटार सायकल लावलेल्या ठिकाणी आले. त्यावेळी त्यांना त्यांची मोटारसायकल अज्ञाताने चोरून नेल्याचे आढळून आले. या प्रकरणी त्यांनी नाटे पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी नाटे पोलिसांनी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.