शिवणे, सुतारवाडी, वडदहसोळ आणि कोंडदसूर परिसरात खळबळ
राजापूर:- राजापूर तालुक्यात चोरट्यांनी एकाच रात्री धुमाकूळ घालत चार दुचाकी आणि एक मोबाईल चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. १९ डिसेंबरच्या सायंकाळपासून ते २० डिसेंबरच्या सकाळपर्यंतच्या कालावधीत ही चोरी झाली असून, याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकाच वेळी अनेक ठिकाणी डल्ला
मिळालेली माहिती अशी की, शिवणे बुद्रुक येथील रहिवासी आणि शिक्षक वैभव देवू करंबे यांनी आपली ‘पॅशन प्रो’ दुचाकी (एमएच ०८ एएच ५४६४) घराशेजारील शेडमध्ये लावली होती. २० डिसेंबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास ते कामावर जाण्यासाठी निघाले असता, त्यांना आपली दुचाकी चोरीला गेल्याचे लक्षात आले.
करंबे यांनी आजूबाजूला शोध घेतला असता, केवळ त्यांचीच नव्हे तर तालुक्यातील इतर तीन ठिकाणांहूनही दुचाकी चोरीला गेल्याची माहिती समोर आली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पॅशन प्रो (एमएच ०८ एएच ५४६४), स्प्लेंडर (एमएच ०८ एव्ही ०९३५),बजाज सीटी १०० (एमएच ०४ सीआर ४१८७), ड्रिम युगा होंडा (एमएच ०८ एसी १५७६) अशा चार दुचाकी गाड्या व ओप्पो कंपनीचा मोबाईल चोरट्यानी लंपास केला.
एकाच रात्रीत चार गाड्यांची चोरी झाल्याने राजापूर पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. याप्रकरणी वैभव करंबे यांच्या फिर्यादीवरून राजापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३०३(२) प्रमाणे अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक बाबींच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, नागरिकांनी आपल्या वाहनांची सुरक्षा वाढवावी आणि संशयास्पद हालचाल आढळल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.









