राजवाडी सुर्वेवाडी येथे शिमगोत्सवावरून दोन गटात वाद; 9 जणांवर गुन्हा

संगमेश्वर:- तालुक्यातील राजवाडी सुर्वेवाडी येथे शिमगोत्सवावरून दोन गटात जोरदार वाद उफाळून आला. या वादातून दोन्ही गटातील 9 जणांवर संगमेश्वर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, याबाबतची तक्रार पोलीस पाटील विलास राऊत यांनी दिली. मौजे राजवाडी ग्रामपंचायत निवडणुकीवेळी गावात दोन गट निर्माण झाले होते. 12 मार्च रोजी दुपारी 11.55 वा. यातील गावप्रमुख कृष्णा शंकर सुर्वे, सीताराम गोपाळ बाईत, जयराम बाबु गुरव, नरेश लक्ष्मण शिर्के व इतर गावकरी राजवाडी सुर्वेवाडी येथे केदारनाथ ग्रामदेवताची सहाणेवर शिमगा सण साजरा करीत होते. यावेळी तेथे सुभाष जानु मांजरेकर (राजवाडी मांजरेकरवाडी), चंद्रकांत राजका भडवलकर (राजवाडी भडवलकरवाडी), प्रकाश गोविंद खांबे (राजवाडी ब्राम्हणवाडी), विजय अर्जुन सुर्वे (राजवाडी सुर्वेवाडी), उपसरपंच दिलीप मधुकर गुरव (राजवाडी गुरववाडी) आदी 9 जणांनी गैरकायदा जमाव केला.

कार्यक्रम चालू ठेवणे व बंद करण्याच्या उद्देशाने गैरकायदा जमाव करून एकमेकांवर आरोप करत अंगावर तावातावाने धावून गेले. याबाबत विलास शांताराम राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, संगमेश्वर पोलीस ठाण्यात 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.