रत्नागिरी:- शहरातील रहाटाघर -झोपडपट्टी येथे पत्याचा रमी खेळ सुरु होता. फिर्यादी यांनी जिंकल्यानंतर पत्ते दाखविले. याचा राग धरुन संशयिताने लाकडी ओंडका मारुन दुखापत केली. या प्रकरणी संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल पाटेकर (वय ३२, रा. पेठकिल्ला-झोपडपट्टी रत्नागिरी. पूर्ण नाव माहित नाही) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. ३०) सकाळी साडेआठच्या सुमारास रहाटाघर झोपडपट्टी येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी मालू रामचंद्र पवार (वय ४८, रा. रहाटाघर झोपडपट्टी, सुर्वेवाडी-रत्नागिरी. मुळ रा. उमदी शांतीनगर झोपडपट्टी, जि. सांगली) हे सोबत साहिलक व दिलिप तसेच संशयित अनिल यांच्यासोबत पत्याचा रमी खेळ खेळत होते. फिर्यादी हे रमी जिंकल्यावर त्यांनी संशयितास दाखवला. त्याचा राग मनात धरुन संशयित अनिल यांनी लाकडी ओंडका फिर्यादी यांच्या डोक्यात मारुन दुखापत व शिवीगाळ केली. या प्रकरणी मालू पवार यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.









